Alandi : आळंदीमध्ये 9 डिसेंबर रोजी वारकरी अधिवेशनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील (Alandi) इंद्रायणी येथे नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, ज्ञानेश्‍वरी, अभंग, गाथा, रामायण, महाभारत यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा यांसह विविध मागण्यांसाठी शनिवार, 9 डिसेंबर 2023 या दिवशी आळंदी येथे 17 व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे अधिवेशन दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक पराग गोखले, ह.भ.प. तुणतुणे महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर आणि पुणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अर्जुन महाराज रासकर, तसेच ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे उपस्थित होते.

प्रतिवर्षी लक्षावधी वारकरी आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने आळंदी येथे श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असूनही अद्याप आळंदी, देहू, पंढरपूर येथील तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. तरी या सुविधा मिळाव्यात, तसेच गोहत्या, तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य टिकवण्यासाठी तीर्थक्षेत्र परिसरात मद्य आणि मांस यांवर बंदी व्हावी.

या प्रसंगी ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे म्हणाले, ‘‘गेली 16 वर्षे सातत्याने हे अधिवेशन घेण्यात येत असून वारकर्‍यांचे विविध प्रश्‍न सातत्याने मांडण्याचे काम हे व्यासपीठ करते. यंदाही अधिवेशनात सहभागी होणारे मान्यवर वारकर्‍यांना मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.’’

ह.भ.प. तुणतुणे महाराज म्हणाले, ‘‘या परिषदेसाठी पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी), विश्‍व हिंदु परिषदचे मठाधिपती देवगड संस्थानचे केंद्रीय मार्गदर्शक श्रीमहंत भास्करगिरी महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज हडपे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. भागवताचार्य केशव महाराज, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्‍वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रामेश्‍वर शास्त्री महाराज, ह.भ.प. गोपाळ महाराज वक्ते यांसह अन्य मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

Pune : सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टी धारकांना मिळणार मोफत घर – जगदीश मुळीक

या अधिवेशनात ब्रिगेडीयर (नि) हेमंत महाजन यांचे ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि आव्हाने’, तसेच माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी हे ‘राष्ट्रासमोरील संकटे’ यावर मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रसंगी संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान समिती आळंदीच्या विश्‍वस्तपदी निवड झाल्याविषयी ह.भ.प. निरंजननाथजी महाराज, भारतानंद सरस्वती महाराज आणि ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी भाविक, सांप्रदायिक साधक यांनी मोठ्या संख्येने त्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.