Alandi Palkhi News : हरिनामाच्या गजरात अलंकापुरीतून माउलींच्या पादुकांचे प्रस्थान

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत माउलींच्या पादुकांचे आज (शुक्रवारी) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास मंदिरातील विना मंडपातून प्रस्थान झाले. कोरोनामुळे यावर्षीही प्रस्थान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण असल्याने भाविकांनी आपापल्या घरात राहून प्रस्थान सोहळ्याचा आनंद घेतला.

पालखी सोहळ्यास पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश एन.पी.धोटे, खासदार बंडू जाधव, विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, डॉ.राम गावडे, उर्जितसिंह शितोळे सरकार, प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर,कृषिकेश आरफळकर, प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अंकुश जाधव, मंडलधिकारी चेतन चासकर, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, फडकरी, दिंडीकरी, मानकरी आदी उपस्थित होते. पुजारी अमोल गांधी, महेश जोशी, राजाभाऊ थेटे, योगेश चौधरी, आदित्य जोशी, यज्ञेश जोशी, राजाभाऊ चौधरी आदींनी पौरोहित्य केले.

अलंकापुरीत प्रस्थान सोहळ्यापूर्वी परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पहाटे काकडा आरती, पवमान अभिषेक झाला. मंदिरात भाविकांना दर्शनास बंदी असल्याने यावर्षी श्रींचे संजीवन समाधी दर्शनास भाविक वंचित राहिले. दरम्यान नऊ वाजता वीणा मंडपात परंपरेने कीर्तन सेवा झाली. दुपारी परंपरेने मंदिरात श्रीनां महानैवेद्य झाला. यासाठी प्रथम सेवेकरी व स्वच्छता स्वयंसेवकांनी श्रींचा गाभारा स्वच्छ केला.

कोरोनामुळे यंदा पायी वारी होणार नाही. त्यामुळे 3 जुलै ते 19 जुलै संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आजोळ घरीच मुक्कामी राहणार आहेत. 19 जुलैला सकाळी 10 वाजता पादुका पंढरपूरकडे एसटी बसने जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.