Alandi : पोलिसांच्या सतर्कतेमुळे टोळीयुद्ध टळले; 23 जणांना अटक

तलवार, कोयता, कु-हाड, चॉपरसारखी घातक हत्यारे जप्त

एमपीसी न्यूज – आपापसातील संघर्ष आणि पूर्ववैमनस्यातून मोशी गावातील सराईत गुन्हेगार स्वप्नील भोसले आणि चिंबळी गावातील भरत जैद यांच्या टोळ्यांमध्ये होणार असलेले टोळीयुद्ध पोलिसांनी हाणून पाडले. यामध्ये पोलिसांनी 23 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते, तलवारी, कु-हाड, चॉपर, सतूर, लोखंडी पाईप, गज, लोखंडी पट्ट्या, मोबाईल फोन, मोटारसायकल आणि कार असा भला मोठा ऐवज जप्त केला आहे.

आपापसातील संघर्ष आणि पूर्ववैमनस्यातून तसेच परिसरात अस्तित्वाची लढाई आणि गुंडगिरीची दहशत निर्माण करण्यासाठी मोशी गावातील सराईत गुन्हेगार स्वप्नील भोसले त्याच्या साथीदारांना घेऊन 31 जुलै रोजी चिंबळी गावात गेला. त्याने जैदचा साथीदार अभि याला मारहाण केली. तसेच जैद आणि त्याचा दुसरा साथीदार सतीश लोखंडे यांचे नाव घेऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली.

  • गुरुवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी दहाच्या सुमारास स्वप्नील त्याच्या 30-40 साथीदारांना घेऊन भरत जैद आणि सतीश लोखंडे यांना ठार मारण्यासाठी पुन्हा चिंबळी गावात गेले. दोघेही मिळून न आल्याने स्वप्नील याने भरत जैदच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून लूटमार केली. तसेच जैदच्या आईला आणि लोखंडे याच्या पत्नीला ‘आम्ही त्यांना सोडणार नाही’ अशी धमकी देऊन गेले. जाताना स्वप्नील आणि त्याच्या साथीदारांनी वैभव मांजरे याला मारहाण केली. जाताना स्वप्नील याने ‘आता आम्ही जातोय. पण, संध्याकाळी आणखी डबल पोरांना घेऊन येतो, त्याला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यावेळी आसपासच्या लोकांनी भीतीपोटी घरे लावून घेतली.

स्वप्नीलने सायंकाळी गावात येऊन राडा घालण्यापूर्वी त्याला व त्याच्या साथीदारांना मारण्याचा कट रचला.

  • सायंकाळी स्वप्नील भोसले त्याच्या साथीदारांना घेऊन घेऊन गावामध्ये राडा करण्याअगोदर त्याला संपवण्याचा कट भरत जैद आणि सतीश लोखंडे यांनी रचला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या 40 ते 50 साथीदारांसह मोठ्या प्रमाणात गज, काठ्या, कोयते, तलवारी, चॉपर, सत्तुर व दगडांचा ढीग रचून ठेवला. चिंबळी येथील पुना रांची कार्गो मुवर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या शेजारी त्यांनी हा कट रचला. मोठ्या प्रमाणात कंपनी शेजारी तरुण थांबले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश सावंत यांना मिळाली. त्यांनी तात्काळ वरिष्ठांशी संपर्क केला.

वरिष्ठांच्या आदेशानुसार परिसरात सापळा रचून पोलिसांनी 23 जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या 23 जणांकडून पोलिसांनी तीन कोयते, दोन तलवारी, एक कुऱ्हाड, एक चॉपर, एक सत्तुर, दोन लोखंडी पाइप, नऊ लोखंडी गज, दोन लोखंडी पट्ट्या, 19 मोबाईल, 12 मोटारसायकल आणि सहा चार चाकी वाहने असा भला मोठा शस्त्रसाठा जप्त केला.

  • या कारवाईत मार्च 2016 रोजी झालेल्या प्रथमेश पगारे यांच्या खुनातील मुख्य आरोपी भरत जैद याला तेरा साथीदारांसह अटक करण्यात आली. आरोपींनी प्रथमेश पगारे याचा खून करून त्याचा मृतदेह इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिला होता. त्यामध्ये आरोपींना अटक करण्यात आली होती. मार्च 2019 मध्ये या केसचा निकाल लागला असून त्यात आरोपी बाहेर आले होते. धीरज कुदळे आणि आशिष शहा या दोन खुनाचे आरोपी देखील यामध्ये पोलिसांच्या हाती लागले. सतीश लोखंडे याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच अन्य आरोपींविरोधात देखील गुन्हे दाखल आहेत.

या घटनेत वेळीच पोलीस घटनास्थळावर पोहोचले नसते तर शहरात गंभीर घटना घडली असती. तसेच जीवितहानी होऊन खुनासारखा गंभीर प्रकार देखील घडला असता. लोकांमध्ये यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींना वेळीच शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

  • ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, रवींद्र गावंडे, शिवाजी कानडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, मनोज कुमार कमले, महेंद्र तातळे, प्रवीण पाटील, विशाल भोईर, सचिन मोरे, गणेश सावंत, तानाजी पानसरे, विजय मोरे, गुन्हे शाखा युनिट दोनचे चौधरी, पंधरे, कुडके, मुंडे, कापसे, सानप, खोमणे यांच्या पथकाने केली.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई अतिशय तत्परतेने केल्याबद्दल अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.