Alandi : प्रदूषणामुळे फेसाळली भक्तीरसाची इंद्रायणी 

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराजांच्या देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी मधून लाखो वैष्णवांचे पापक्षालन करून अविरत धावणा-या इंद्रायणी नदीची आज अवस्था अतिशय बिकट आहे. नाल्यांचे पाणी, नदी काठावरील प्रदूषण, त्यातून निर्माण होणारी जलपर्णी आणि दुर्गंधीयुक्त फेस यामुळे इंद्रायणी नदी आहे की नाला हा यक्ष प्रश्न सध्या उभा आहे. भक्ती रसाने ओतप्रोत होऊन वाहणारी नदी दुर्गंधीयुक्त नाल्याकडे वाटचाल करत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील नागरिक जबाबदार आहेत.

इंद्रायणीच्या उगमापासून इंद्रायणी अतिशय स्वच्छ पाणी घेऊन वाहते. जसजशी ती पिंपरी-चिंचवड आणि देहू आळंदीच्या दिशेने वाहत येते, तसतसे शहरातील नाल्याचे पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे नदीचे पाणी बदलू लागते. आळंदी पर्यंत येईस्तोवर इंद्रायणी नदीचे रूपांतर नाल्यात होते. ठिकठिकाणी वाढलेली जलपर्णी दिसते. मागील काही दिवसांपासून नदीवर दुर्गंधीयुक्त पांढरा फेस येत आहे. यामुळे नदीमधील जलचर पूर्णपणे नष्ट झाले असून नदी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे.

आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक आहे. आषाढी, कार्तिकी एकादशी, तुकाराम बीज यानिमित्त लाखो भाविक भक्त देहू-आळंदी मध्ये येतात. इंद्रायणी नदीचे दूषित पाणी देहू-आळंदी येथील भाविक तीर्थ म्हणून प्राशन करतात. नदीत स्नान करून मानवी देहाला पवित्र करून घेण्याची परंपरा आहे. मात्र या दूषित पाण्यामुळे या भाविकांच्या आरोग्याचा देखील मोठा प्रश्न आहे. या पाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडले जावे, नदी प्रदूषण कमी करावे, यासाठी स्थानिक, राजकीय, सामाजिक, पर्यावरण प्रेमी संस्था अशा अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले.

काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी राजकीय मंडळींना सांगण्याऐवजी आपण स्वतः सुरुवात करून नदी स्वच्छतेचा जागर सुरु केला. मात्र त्यालाही म्हणावे तसे यश मिळत नाही. सर्व पातळ्यांवर समान प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत ही मोहीम पूर्ण यशस्वी होणार नाही. राजकीय पातळीवरील आरोप-प्रत्यारोपामुळे मूळ विषयाला कायम बगल मिळाली आहे. स्वच्छ, सुंदर आणि पवित्र इंद्रायणी नदी केवळ बोलण्यापुरती उरली आहे. या सगळ्यात नदी अखेरचा श्वास घेत आहे हे मात्र नक्की !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.