Alandi : जगातील सर्वांत श्रीमंत माणूस म्हणजे शिक्षक – डॉ. रामचंद्र देखणे

जगातला अंधार नाहीसा करण्याचे सामर्थ्य सूर्यात असते आणि त्याच प्रकाशमालेतील ज्ञानाचे दीप लावण्याचे काम शिक्षक करत असल्याने जगातील तो सर्वांत श्रीमंत माणूस म्हटला जातो, असे प्रतिपादन संतसाहित्य व लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी आज येथे केले. आळंदी येथे भरलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय चिंतन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या शिबिराला राज्यभरातून मराठी भाषेचे अध्यापन करणारे अध्यापक आलेले आहेत.

शिबिराचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे व आमदार दिलीपशेठ मोहिते यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले होते.

याप्रसंगी स्वागताध्यक्ष हनुमंत कुबडे, समाज शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अजित वडगावकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मधुकर नाईक, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष उत्तम पोटवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे पुढे म्हणाले, की ज्ञानाची उपासना करणारी संस्कृती म्हणून संपूर्ण जग भारताकडे पाहते. आज ज्ञानियांचा राजा अशी ओळख असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीत हे चिंतन शिबिर आयोजित केलेले असल्याने त्यास विशेष महत्त्व आहे. जगातला अंधार नाहीसा करण्याचे सामर्थ्य हे सूर्य, दिवा व शिक्षकांमध्येच आढळते. उजेडाचे व प्रकाशाचे वरदान घेऊनच शिक्षक हा समाजापुढे जात असल्याचे त्यांनी म्हटले.

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी आपल्या भाषणात, मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आज अध्यापक संघाने हे शिबिर आळंदीत भरवून विदयार्थी हा केंद्रबिंदू मानत इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे संवेदना व भावनेपासून दुरावलेल्या विदयार्थ्याला पुन्हा मातृभूमीकडे नेण्याचे कार्य या शिबिरातून यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी, मराठी माध्यमातील ढासळता पट यावर चिंता व्यक्त करून मातृभाषेतील शिक्षणातून केवळ व्यक्तिमत्त्व विकास होणार नाही तर याद्वारे संस्कृतीचा विकास होणार असल्याचे म्हटले.

पुण्याचे समाज शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी या शिबिरातून एक चांगली सर्जनशीलता निर्माण होऊन ही पाऊलवाट एक धोरणात्मक निर्णयाकडे नेणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

या शिबिराचे स्वागताध्यक्ष हनुमंत कुबडे यांनी ‘मराठी भाषेचे महत्त्व, दर्जा व मूल्यात्मक चिंतनासाठी या शिबिराचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे म्हटले. प्रास्ताविक यशवंत बेंद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले व स्मिता ओव्हाळ यांनी केले. आभार संतोष काळे यांनी मानले. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.