Alandi : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बारा वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई पिस्तुल आणि तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी येथे 2007 साली झालेल्या खुनातील आरोपी तब्बल बारा वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दत्ता एकनाथ लोणकर (वय 35, रा. लांडेवाडी, विठ्ठलनगर झोपडपट्टी, शिवसेना चौक, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीने मंगळवारी आळंदी येथून प्रस्थान ठेवले. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पालखी सोहळ्यात चोख बंदोबस्त ठेवला. गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम तयार करून पालखी सोहळ्यात चोरी आणि पाकीट चोरीचे प्रकार घडू नये, यावर नियंत्रण ठेवले जात होते.
_MPC_DIR_MPU_II

देहूफाटा येथे गुन्हे शाखेच्या पथकाला एक संशयित इसम पोलिसांना पाहून पळून जाताना दिसला. त्याबाबत अधिक संशय आल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे मिळून आली.

  • पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त करत त्याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. आरोपी दत्ता लोणकर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले. भोसरी येथील नंदू लांडे यांच्या खुनामध्ये दत्ता लोणकर हाच साक्षीदार होता तर, बबलू शेख हा त्या खुनातील आरोपी होता. दत्ता लोणकर याने न्यायालयात बबलू शेख विरोधात साक्ष देऊ नये म्हणून बबलू त्यास वारंवार दमदाटी करत होता. यावरून दत्ता लोणकर याने त्याचे साथीदार लक्ष्मीकांत गालफाडे, संजय जाधव, अमजर बाकरा, योगेश जाधव यांच्यासोबत मिळून 2007 साली बबलू शेख याचा खून केला.

याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. दत्ता लोणकर याच्यावर याव्यतिरिक्त दरोड्याचा एक आणि मारहाणीचे 5 असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात तो मागील बारा वर्षांपासून फरार होता.

  • ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, प्रमोद लांडे, सचिन उगले, महेंद्र तातळे, प्रवीण पाटील, मनोजकुमार कमले, गणेश सावंत, गणेश मालुसरे, विशाल भोईर यांच्या पथकाने केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1