Alandi: मुलांना अभिव्यक्त करण्याची जबाबदारी शिक्षकांची – प्रा. मिलिंद जोशी

एमपीसी न्यूज – हल्लीचे जीवन व शिक्षणदेखील चिन्हांकित होत चालले असून त्यांच्यांशी संवाद साधत बोधकथेच्या माध्यमातून जीवनानुभव देत त्यांनी अभिव्यक्त व्हावे इथपर्यंत त्यांना घडविण्याची जबाबदारी भाषा शिक्षकांची असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी आज येथे केले.

मराठी अध्यापक संघ, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या राजस्तरीय चिंतन शिबिरामध्ये ‘आपली मुलं घडवताना’ या विषयावरील सत्रामध्ये ते बोलत होते. अध्यापक संघाच्या सुरेखा सोनवणे, मंगला निफाडकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

प्रा. जोशी पुढे म्हणाले, जागतिकीकरणामुळे भाषा व संस्कृतीत बदल झाला असून सामाजिक पातळीवरही या स्थित्यंतराची लाट आली आहे. अशा परिस्थितीत मुलांचे भाषिक कुपोषण होत असल्याने उदरभरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कल्पक शिक्षकांची चरित्रे अध्यापकांनी वाचून सहज कौशल्य शिक्षणातून ते मुलांना शिकविली पाहिजे. सृजनशीलता, प्रयोगशीलता आणि कृतिशीलता हा नव्या शिक्षणाचा उगम असून शिक्षकांनी त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. मुलांनी वाचावे असे वाटत असेल तर सर्वप्रथम शिक्षक व पालकांनी वाचले व ऐकले पाहिजे. आपल्या भाषेचे प्रेम हे आंतरिक जाणिवेतून प्रकट व्हायला हवे असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा सोनवणे यांनी प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ सदस्या संध्या माने यांनी आभार मानले. स्वागताध्यक्ष पदी हनुमंत कुबडे होते. नियोजन अशोक तकटे, ज्ञानदेव दहिफळे, नाना शिवले, संतोष काळे, विष्णु मुंजाळे, सोमनाथ भंडारे, नवनाथ तोत्रे, कैलास घेनंद, सुरेश लोखंडे, भास्कर पानसरे, स्मिता ओव्हाळ, दीपाली नागवडे, रुपाली ढमढेरे, सोनाली कातोरे, हेमा नवले, संजय गवांदे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.