Alandi : देवाच्या आळंदीत सराईत गुन्हेगारावर वार; परिसरात खळबळ

एमपीसी न्यूज – देवाची आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माउली मंदिर परिसरात एका सराईत गुन्हेगारावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. ही घटना आज (रविवारी) दुपारी आळंदी घाटावर घडली.

लंकेश ठाकूर (वय 30) असे गंभीर जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंकेश पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात काही गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याने त्यातूनच हा प्रकार झाल्याचा संशय आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराजवळ असलेल्या इंद्रायणी नदीच्या घाटावर आज दुपारी लंकेश याच्यावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार केले.

यामध्ये लंकेशच्या डाव्या बाजूला मानेवर, उजव्या कानामागे आणि छातीवर गंभीर दुखापत झाली. घटनास्थळावरून लंकेश याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो घाटावर काही अंतर चालत गेला आणि घाटावरील कुंडाजवळ पडला. त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • भरदिवसा झालेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.