Alandi : आळंदीत लग्न करायचे आहे, मग हे नवे नियम पहा ….

Want to get married in Alandi, then check out these new rules ....

एमपीसी न्यूज – संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी भूमीत लग्न करुन नवीन आयुष्याची सुरुवात करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, यापुढे  वधू किंवा वर आळंदीमधील रहिवासी असेल तरच त्यांना आळंदी शहरात लग्न करता येणार आहे, असा आदेश पुणे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात  आला  आहे. सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी टाळण्यासाठी काही नियम लावण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या या आदेशामुळे आळंदी शहराच्या बाहेरील प्रेमविवाह, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना अडथळा आला आहे.  दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोणताही गाजावाजा न करता सार्वजनिक ठिकाणी लग्न करणाऱ्या दोन प्रकरणात आळंदी प्रशासनाने कारवाई केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी केल्याबाबत ही कारवाई केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि लग्न समारंभ या दोन कारणांमुळे आळंदी शहर कायम गजबजलेले असते.

पालखी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक भक्त आळंदी नगरीत दाखल होतात. तर लग्नाच्या निमित्ताने आळंदी मधील धर्मशाळा, मंदिरे आणि मंगल कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

आळंदी नगरीत शेकडो धर्मशाळा, मंगल कार्यालये आणि मंदिरे असल्याने इतर शहरातील नागरिक देखील आळंदीत येऊन विवाह सोहळा साजरा करतात.

सध्या लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक ठिकाणी विवाह सोहळा साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. घरच्याघरी लग्न लावता येतील. परंतु तिथेही जास्तीत जास्त 50 लोकांनाच एकत्र येण्यास परवानगी आहे. त्यातही नागरिकांना सामाजिक अंतर पाळायचे आहे.

प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केले तर संबंधितांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. वधू आणि वर या दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले जाणार आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी आळंदी येथे सार्वजनिक ठिकाणी लग्न केल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात धर्मशाळा, मंगल कार्यालय, मंदिरात लग्न लावणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार असल्याचे आळंदीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी सांगितले.

आळंदी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर भूमकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.