Alandi : पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर असताना इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

एमपीसी न्यूज : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या (Alandi) प्रस्थान सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असताना आज इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून आली. इंद्रायणी काठी असलेल्या गावातून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी थेट इंद्रायणी पात्रात सोडले जाते. त्यामुळे या नदीपात्राचे जल प्रदूषित होत आहे.

दि.11 जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान आहे. प्रस्थाना निमित्त व आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त  वारकरी भाविकांचे काही दिवस अगोदरच अलंकापूरीमध्ये आगमन होत असते. आलेले वारकरी भाविक श्रद्धापूर्वक पवित्र तीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीच्या जलाचे प्राशन करतात. व त्या नदीपात्रात स्नानही करतात.

परंतु सद्यस्थितीत इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहे. व मोठ्या प्रमाणावर वारंवार फेसाळूनही दिसून येत आहे. या नदीपात्रात स्नान केल्यास त्वचा रोग ही होऊ शकतात. जल प्राशन केल्यास आरोग्यास धोका संभवतो. यामुळे हे जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषण करण्याऱ्यांवर वेळोवेळी (Alandi) कारवाई करणे गरजेचे आहे.

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी गेली अनेक वर्षे जनजागृतीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी दि.1 मे महाराष्ट्र दिनी साखळी उपोषणाला बसले होते. पाच दिवस साखळी उपोषण चालले होते, या उपोषणाची दखल घेत उपविभागीय दंडाधिकारी यांनी येत्या दहा दिवसांत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सर्व संबंधितांची बैठक लावण्यात येईल असे आश्वासन देऊन साखळी उपोषण सोडण्यात आले होते.

दिलेल्या कालावधीत संबंधित बैठक न बोलवल्याने  इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने दि.26 मे रोजी जिल्हा आधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले दोन दिवसात त्या संदर्भात बैठक बोलवू. परंतु अद्याप इंद्रायणी प्रदूषण संदर्भात  बैठक आयोजित केली गेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा उत्सव तोंडावर असताना इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

MPC News Special : इथे आटला मायेचा पान्हा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.