Alandi News : आळंदीकरांकडून महापौर मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्कार!

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र आळंदी येथील येथील भामा आसखेड पाणी योजनेतून विशेष पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांचा समस्त आळंदीकर नागरिक आणि महाराज मंडळीच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी हभप नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते महापौरांना वारकरी संप्रदायाचा फेटा, संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, हभप चैतन्य महाराज लोंढे, आध्यात्मिक विकास आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख हभप संजय महाराज घुंडरे, माजी सभापती डी.डी. भोसले, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, सचिन पाचुंदे, शारदा वडगावकर, हभप भाऊमहाराज फुरसुंगीकर, माऊली वीर, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, सागर बोरुंदिया, सचिन काळे, माजी नगरसेवक दिनेश घुले, अशोकराव उमरगेकर, नंदकुमार कुऱ्हाडे, वासुदेव घुंडरे, भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, अजित वडगावकर, भागवत आवटे, गुलाबराव खांडेभराड, माऊली बनसोडे, पांडुरंग ठाकुर, आसाराम महाराज बडे, पंडित महाराज क्षीरसागर, महाराज मंडळी आणि आळंदीकर नागरिक आणि आळंदीकर नागरिक तसेच महापौरांच्या मातोश्री आणि बंधू सुध्दा उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या क्षेत्र आळंदीत अर्थात अलंकापुरीत भामा आसखेड पाणी योजनेतून विशेष पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात मोलाची भूमिका निभावण्याची संधी मिळाली. खरे तर ही योजना मंजूर करण्यात मी केवळ निमित्तमात्र होतो, कारण आळंदीकरांच्या सामूहिक पाठपुराव्याचेच हे यश आहे. हभप नारायण महाराज जाधव यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाचा फेटा, संत ज्ञानेश्वर महाराज मूर्ती देऊन सन्मानित केले. आजवर अनेक सन्मान स्विकारण्याची संधी मिळाली, मात्र माऊलींच्या मंदिरात आणि आईच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान कायम स्मरणात राहील.

आळंदी शहराला पाणी देण्याच्या या निर्णयाला खरंतर कोणाचाही विरोध नव्हता, तरीही प्रशासकीय पातळीवर ही मागणी पूर्ण करण्यासाठी विशेष पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर कोणत्याही अटी-शर्तीशिवाय आळंदीला पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली, विशेष योगायोग म्हणजे त्याच दिवशी आळंदी शहराला जलसंपदा विभागाकडून स्वतंत्र पाण्याचा कोटा मंजूर करण्यात आला आणि आळंदीला स्वतःचे हक्काचे पाणी मिळाले.

आळंदीतील नागरिक, भाविक आणि वारकऱ्यांना हा पाणीपुरवठा मंजूर झाला, याचे मला आत्मिक समाधान आहे आणि माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात कायम आठवणीत राहील, असा हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे, असेही महापौर मोहोळ यावेळी म्हणाले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप चैतन्य महाराज लोंढे  यांनी केले तर आभार संजय घुंडरे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.