Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली

एमपीसी न्यूज : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज गुरूवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बंदी उठवावी की नाही याबाबत मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांमध्ये मतमतांतरे होती. पण सगळ्याच बाबी तपासून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्रीमंडळ बैठक संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयासाठी काहींचा विरोध होता तर काहींचा पाठिंबा होता. पण अखेर दारूबंदी उठवण्याचा निर्णय आज घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घातल्यानंतर इतर ठिकाणाहूनही दारू जिल्ह्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. तर अनेक ठिकाणी येणाऱ्या गावठी दारूमुळे विषबाधेचेही प्रकार समोर आले होते. त्यामुळेच ही दारूबंदी उठवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती.

सगळ्याच बाबी तपासून हा निर्णय झाल्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. दारूबंदीचे दुष्परिणाम याबाबतची माहितीही यावेळी घेण्यात आली होती. तसेच एक अहवालही मागवण्यात आला होता. परंतु सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

दारूबंदी का उठवली ?

झा समितीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे दारूबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली असून, जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू आणि बनावट दारू काळ्या बाजारात उपलब्ध होत आहे. ही दारू अतिशय घातक आहे. यातून दारूचा काळाबाजार देखील वाढला आहे.

शासनाचे वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसूलाचे मोठे नुकसान झाले आहे व गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाली आहे. तसेच, दारुबंदीच्या बाबतीत बहुसंख्य संघटना, नागरिक व रहिवाशांनी दारुबंदी मागे घेण्याच्या बाजुने कौल दिला आहे. या कारणांमुळे झा समितीने दारुबंदी उठविण्याबाबत निष्कर्ष काढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.