Pune News : महामार्गावर धोकादायक स्थितीत वाहन उभं करताय ? मग ही बातमी वाचायलाच हवी

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय तसेच राज्यमहामार्गावर धोकादायक स्थितीत वाहन थांबवणा-या वाहनांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात आहे. मागील सात दिवसांत पुणे ग्रामीण हद्दीतून जाणा-या सात वेगवेगळ्या महामार्गावर 2 हजार 844 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पुणे ग्रामीण, पुणे विभाग आणि बारामती विभाग पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांच्या वतीने ही कारवाई केली जात आहे. पुणे-सातारा, पुणे- मुंबई (जुना व नवीन), पुणे- सोलापूर, पुणे-नाशिक, कल्याण-जबलपुर, पुणे- सासवड (सासवड जेजुरी मार्गे), पुणे-अहमदनगर या महामार्गावर मागील सहा महिन्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभं करणे हे प्रमुख कारण ठरत आहे. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक स्थितीत वाहन उभे असलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.

वाहनाला मागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या महामार्गावर 10 ते 16 सप्टेंबर दरम्यान विशेष मोहिम राबवत सात दिवसात 2 हजार 844 धोकादायक स्थितीत उभी असलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे. महामार्गावर अपघाताला निमंत्रण देणा-या धोकादायक स्थितीत उभे असणा-या वाहनांवर यापुढे देखील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.