Talegaon : इंदोरीच्या छाया मराठे यांना मिळाला तुकोबांच्या पालखी सोहळ्यात ‘तुळशी वृंदावना’चा मान

chayaa Marathe of Indori got the honor of 'Tulshi Vrindavana' in Tukoba's Palkhi ceremony

एमपीसी न्यूज – जन्मा आलो त्याचे | आजि फळ झाले साचें || तुम्ही सांभाळीलो संती | भय निरसली खंती || कृतकृत्य जालों | इच्छा केली ते पावलों ||

पायी वारीसह भगवंताची मनापासून भक्ती करणाऱ्या इंदोरी येथील छाया अशोक मराठे या एकमेव वारकरी महिलेस शासनाच्या निर्देशानुसार प्रस्थान झालेल्या संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात तुळशी वृंदावन घेऊन जाण्याचा मान मिळाला आहे.

छाया मराठे यांच्या भक्तीचे आज खऱ्या अर्थाने सार्थक झाले. अखंड वारकरी संप्रदाय घरातून विठ्ठलभक्ती करत असताना प्रत्यक्ष विठ्ठलानेच छाया यांना बोलावून घेतले, अशी भक्तीपूर्ण चर्चा संपूर्ण मावळ परिसरात सुरू आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने काल (मंगळवारी) संत तुकोबारायांचा 335 वा पालखी सोहळा शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसद्वारे श्री क्षेत्र देहू येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्यात देहू संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त व सेवेकरी अशा फक्त 20 जणांचा समावेश होता.

या 20 वारकऱ्यांमध्ये तुळशी वृंदावन घेऊन जाणारी एकमेव महिला वारकरी आहे. तुळशी वृंदावन घेऊन जाण्याचा बहुमान मावळ तालुक्यातील इंदोरी येथील मराठे कुटुंबाला मिळाला आहे. या पालखी सोहळ्यात मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना मान मिळाला आहे.

छाया मराठे ह्या इंदोरी येथील वारकरी संप्रदायाचा वारसा असलेल्या मराठे परिवारातील स्नुषा असून वडगाव मावळ येथील सामाजिक कार्याचा वारसा असलेल्या माजी सरपंच स्व.पै.केशवराव ढोरे यांच्या परिवारातील पंढरीनाथ ढोरे यांच्या भगिनी आहेत.

पती अशोक मराठे हेही त्यांच्या भक्तीसेवेत समरस होत असून मुलगा स्वराज हा सध्या घोरवडेश्वर डोंगरावर संप्रदायाचे शिक्षण घेत आहे.

माहेराकडून मिळालेला सामाजिक वारसा आणि सासरी मिळालेला सांप्रदायिक वारसा यामुळे श्री विठ्ठल भक्तीकडे वळालेल्या छाया मराठे यांना पती अशोक मराठे यांनीही साथ दिली. दोघेही गेल्या काही दिवसांपासून श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर भजन म्हणत तसेच पायी जाऊन दर्शन घेतात.

संत तुकोबारायांच्या पालखी प्रस्थान दिनापासून हे दांपत्य दररोज भंडारा डोंगराला प्रदक्षिणा घालून डोंगरावर जाऊन दर्शन घेण्याचा नित्यक्रम करत होते.

दरम्यान, पालखी सोहळ्याचे नियम ठरल्यानंतर अचानक त्यांना पालखी सोहळ्यात निवड झाल्याचा फोन आला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्या पालखी सोहळ्यात तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या व पालखी बरोबर पंढरपूरकडे मार्गस्थही झाल्या.

हेचि व्हावी माझी आस l जन्मोजन्मी तुझा दास ll
पंढरीचा वारकरी l वारी चुको नेदी हरी ll
संतसंग सर्वकाळ l अखंड प्रेमाचा सुकाळ ll
चंद्रभागे स्नान l तुका मागे हेचि दान ll

अशा शब्दात छाया यांनी विठ्ठल भक्तीचे तुकोबांच्या शब्दात गुणगान केले आहे.

श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या सेवेचे फळ !

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना ज्या भूमीमध्ये साक्षात पांडुरंगाचा साक्षात्कार झाला, त्या भंडारा डोंगराला प्रदक्षिणा, पायी जाऊन दर्शन, अखंड हरिनाम सप्ताह, पारायण सोहळ्यात सहभाग अशा नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचे फळ म्हणूनच भगवान पांडुरंग, संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपेने छाया मराठे यांना ही संतसेवेची संधी मिळाली आहे. – ह.भ.प.बाळासाहेब काशिद (पाटील)-अध्यक्ष, श्री क्षेत्र भंडारा डोंगर दशमी समिती.

 

सेवेचे सार्थक झाले !

आमच्या कुटुंबाला वाडवडिलांपासून जनसेवेचा वारसा असून भगिनी छाया हिच्या सासरीही वारकरी सांप्रदयाची परंपरा आहे. या माध्यमातून आजपर्यंत दोन्ही कुटुंबाकडून झालेल्या सेवेचे भगिनी छाया हिच्या भक्तीमुळे खऱ्या अर्थाने सार्थक झाले आहे.- पंढरीनाथ ढोरे : माजी उपसरपंच वडगाव व माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like