Pune: दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी काळजी घ्यावी

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुण्यातील दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असून जे रुग्ण संशयित आहेत. त्यांनी 14 दिवस कुठेही घराबाहेर पडू नये. घरीच थांबावे, ज्या विद्यार्थ्यांना सुटी मिळाली आहे. त्यांनी आपल्या घरामध्येच थांबावे. तसेच परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज (शनिवारी) दिली. तसेच नागरिकांनी आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाहीत. त्यांनी घराबाहेर फिरू नये. वयाने लहान असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी त्यांच्या पालकांनी घ्यायची आहे. त्याबाबत प्रशासनाकडून पालकांना सूचना देण्यात येणार आहेत. पुण्यात येणाऱ्या नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. सॅनेटायझर्समध्ये भेसळ करणाऱ्या तिघांना काल अटक करण्यात आली आहे. या व्यक्ती भेसळ करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर तातडीने ही कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन करून डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये, तलाव, जीम, नाटयगृह, चित्रपटगृह, बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू आहे. कुलगुरू, कुलसचिव यांची बैठक घेत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने व खबरदारीसाठी आवश्यक असलेल्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात आहे. काल परदेशातून आलेल्या 112 नागरिकांची स्क्रीनिंग करण्यात आली असून यामध्ये कोरोनाबाधीत सात देशातून कोणताही नागरिक आला नाही. 15 फेब्रुवारीनंतर पुणे विमानतळावर उतरलेल्या सर्व प्रवाशांचा तपास सुरू आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क केला जात असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. त्यांनी यात्रा, उत्सव, लग्न समारंभ असे गर्दीची ठिकाणे टाळावीत. सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास अशी लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ उपचार घ्यावेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणू संदर्भात येणा-या संदेशाची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री 104 क्रमांक करोना विषयक शंका समाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.