Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे गुरुवारपासून अॅग्रीकल्चरच्या कॉलेजच्या मैदानावर ‘ब्रह्मोद्योग-2018’ महोत्सव

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे ‘ब्रह्मोद्योग-2018’ या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शन आणि दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद या महोत्सवात होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. 25 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता भोसलेनगर येथील अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर केंद्रीय उद्योग मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार अमर साबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कुलगुरु पंडित वसंतराव गाडगीळ, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहतील. शनिवार, 27 ऑक्टोबर व रविवार, 29 ऑक्टोबर 2018 या दोन दिवशी परिषद होणार असून, देशभरातील जवळपास 1000 उद्योजक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

दि. 25 ऑक्टोबर रोजी मुख्य उद्घाटन सोहळ्यानंतर सकाळी 11.00 राज्यस्तरीय ब्राह्मण महिला मेळावा आयोजिला आहे. यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, अभिनेत्री मृणाल देव, आमदार मनिषा कायंदे, शोभाताई फडणवीस, सिम्बायोसिसच्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी 4.00 वाजता वकिल आघाडीचा मेळावा होणार आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीश व्यंकटेश्वरैय्या, अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे, अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांच्यासह न्याय व विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील.

दि. 26 ऑक्टोबर 2018 रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व इतर सलग्नित संस्थांच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांचे अधिवेशन व ‘समाजभूषण’ पुरस्कारांचे वितरण होणार आहे. दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन शनिवार, दि. 27 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते, तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, माजी खासदार तरुण विजय, श्रीकांत भारतीय, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, नीलम गोर्‍हे, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ आदी उपस्थित असणार आहेत.

परिषदेचा समारोप रविवार, दि. 28 ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 4.00 वाजता गोविंदगिरी महाराज आणि खासदार अमर साबळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उद्योजक अशोक देशपांडे यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार, तर विद्या मुरकुणबी, संतोष पांडे, रमणाचार्य हैदराबाद, राध्येशाम जयमिनी, सुभाष तिवारी यांना ‘उद्योगभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या परिषदेमध्ये विविध चर्चासत्र होणार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. व्यवसायाच्या संधी, अर्थसहाय्य, व्यवस्थापन, व्यवसायातील आव्हाने आणि संधी, कर व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत. दि. 29 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 ते 3  या वेळेत राज्यस्तरीय ब्राह्मण एकत्रिकरण मेळावा आयोजिला आहे. तसेच ‘सन्मान, सहकार्य व संरक्षण’ या त्रिसूत्रीवर चर्चा होणार असून, यासाठी डॉ. गोविंद कुलकर्णी, वा. ना. उत्पात, श्री गोवर्धनजी शर्मा, मोरेश्वर घैसास गुरुजी, अशोक बोडस यांच्यासह ब्राह्मण चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, उद्योग आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र जोशी, प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रदेशाध्यक्ष उदय महा व जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.