Pune : महापालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी स्वच्छतेच्या मैदानात

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका आयुक्त सौरव राव यांनी रात्री स्वच्छ सर्वेक्षणची पाहाणी केली. या दरम्यान त्यांनी गोटीराम भैय्या चौकात अस्वच्छता करणाऱ्या पानधारकाला झाडू घेऊन स्वच्छता करायला लावली. मकर संक्रांतीला (दि.15) रात्री आयुक्तांनी शहरात स्वच्छ तयारीची पाहणी केली.

वारजे – कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतून सुरूवात करून शहरातील मध्यवस्तीत शिवाजी रस्त्यावरील गोटीराम भैय्या परदेशी चौकातील पानपट्टीच्या आसपास व रस्त्यावर कचरा व गुटखा पडलेला आढळला. आयुक्तांनी जाब विचारलाच व हातात झाडू देऊन स्टाॅलधारकास झाडून घेण्यास भाग पाडले.

यापूर्वी रस्त्यावर थुंकणा-यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करून थुंकणा-यांकडूनच रस्त्यातच साफसफाई करून घेत होते, याची आठवण झाली. आतापर्यंत ४७ हजार रस्त्यावर घाण करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून रुपये १.५ कोटी दंड वसूल केला आहे.

गेली दहा दिवस आयुक्त यांच्याबरोबर सह आयुक्त माधव जगताप, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी संपूर्ण शहर पिंजून काढले आहे. रात्री व सकाळी लवकर राऊंड सुरू करून योग्य त्या सूचना व मार्गदर्शनाबरोबरच अन्य खात्याची मदत पुरवण्यात येत आहे. यामुळे सर्व यंत्रणा कार्यरत झाली असून प्रत्यक्ष फिल्डवर सर्व पालक खातेप्रमुख, उप आयुक्त, सहा आयुक्त हे स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये प्रथम येण्यासाठी कष्ट व प्रयत्न करीत आहेत. सर्व सफाई कर्मचारी स्वच्छचे कचरावेचक व घनकचरा व्यवस्थापन विभागाची पूर्ण यंत्रणा रात्रदिवस काम करीत आहे.

तसेच मनपाचे सर्व कचराप्रकल्प कार्यरत असून १००% पुणे शहरात निर्माण होणारा २१०० मेट्रिक टन कच-यावर गेली १५ दिवसापासून (दिनांक २ जानेवारी) प्रक्रिया करीत असून एनजीटीला व फुरसूंगी- ग्रामस्थांनी ओपन डपिंग करू नये, ही मागणी होती ती पूर्ण केली आहे. प्रशासनाने हाती घेतलेले मिशन २०२० :: व्हिजन शून्य ते १०० नक्कीच पूर्ण होताना दिसत असून यावर्षी सर्वेक्षण २०२० मध्ये पुणे इंदौरला मागे टाकून षटकार मारून प्रथम येणार असल्याचा महापालिका अधिका-यांना विश्वास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.