Talegaon news : आयआरबी कंपनी संचालित टोलनाका बंद करण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

एमपीसी न्यूज : आयआरबी कंपनीकडून सोमाटणे टोल नाक्यावर स्थानिकांकडून होणा-या टोल वसुली संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीय नेते व आयआरबी कंपनी यांची संयुक बैठक तळेगाव पोलीस स्टेशन येथे आयोजित केली होती.

मात्र त्यातील बोलणी फिसकटली असून निवेदनातील मागण्या मान्य केल्या नाही तर रविवार (दि 21) रोजी सकाळी सोमाटणे टोलनाक्यावर सर्व पक्षीय मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. आयआरबी कंपनी संचालित टोलनाका कायम स्वरूपी बंद व्हावा अशा आशयाचे निवेदन वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून  देण्यात आले.

यावेळी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, सभागृह नेते अमोल शेटे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, रस्ते साधन सुविधा व आस्थापना पुणे जिल्हा अध्यक्ष मनसे सचिन भांडवलकर, अॅड राम शहाणे,आरपीआयचे सुनील पवार, नगरसेवक संतोष शिंदे, बांधकाम समिती सभापती  निखिल भगत, मिलिंद अच्युत,सुनील कारंडे, शिवसेना माजी शहर प्रमुख सुनील उर्फ मुन्ना मोरे, विशाल वाळुंज, कल्पेश भगत, रोहन भोसले आदी उपस्थित होते.

सोमाटणे टोलनाका उभारताना दोन टोल नाक्यांमध्ये कमीत कमी 40 किमीचे अंतर असायला हवे असून तळेगाव हद्दीतील टोल नाका पुढे हलवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

वारंवार वाहतुकीची कोंडी तळेगावकर नागरिक सहन करीत आहेत, या टोल नाक्याचा तळेगावकर नागरिकांना काहीही उपयोग नसून डोके दुःखी अधिक आहे. स्थानिक नागरिकांच्या पैशांची लूटमार सुरू असून अशा लूटमार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा. अशी मागणी उपस्थितांनी केली. 15 ते 20 मिनिट वाहतुकीची कोंडी होऊन देखील टोल भरावा लागत असल्याने वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होत आहे व आयआरबी प्रशासन मूग गिळून गप्प बसले आहे.

सर्व पक्षीय नेत्यांच्या जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या 21 तारखेला आंदोलन व्यापक स्वरूपाचे होईल असा इशारा दिला आहे.

दरम्यान निर्णय घेण्यास आयआरबीचे सक्षम अधिकारी या बैठकीस उपस्थित नसल्याने  तोडगा निघू शकला नाही. मंगळवारी (दि 16) सायंकाळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय आंदोलनकर्ते आणि आयआरबीचे वरीष्ठ अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.