All Party Meeting: भारत-चीन सीमेवरील परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी शुक्रवारी बोलावली सर्वपक्षीय बैठक

All Party Meeting: The Prime Minister convened an all-party meeting on the situation on the Indo-China border on Friday

एमपीसी न्यूज – भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी तसेच त्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (शुक्रवारी) संध्याकाळी पाच वाजता सर्वपक्षीय ‘डिजिटल’ बैठक बोलावली आहे.

चीनने कुरापत काढल्याने गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या गोळीबारात किमान 43 चिनी सैनिकांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीमुळे भारत-चीन दरम्यान संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. भारतीय जवानांच्या हौतात्म्यामुळे देशभर चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर भारत-चीन संबंधांबाबत सद्यस्थिती तसेच पुढील रणनीती याबाबत या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. परकीय आक्रमणाचा सामना करण्यासाठी सर्वपक्षांचा एकमुखाने पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

चीनबरोबर झालेल्या चकमकीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही मुद्दे उपस्थित केले असून त्यांना पंतप्रधान या बैठकीत उत्तर देतील, अशी शक्यता आहे. सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना या ‘व्हर्च्युअल मिटींग’चे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी काल चीनला ठणकावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.