All Party Meeting: भारतमातेकडे डोळे वर करुन पाहणाऱ्यांना धडा शिकवून ‘ते’ जवान शहीद झाले – पंतप्रधान मोदी

All Party Meeting: 'Those' jawans martyred after teaching a lesson to those who look up to Mother India - PM Modi सीमाभागात भारताच्या एक इंच जागेवरही कोणाची घुसखोरी झाली नसल्याची सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी दिली ग्वाही

एमपीसी न्यूज – आपल्या सीमाभागात कोणीही घुसले नसून आपली कोणतीही पोस्ट शत्रूच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर जवान शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारत मातेकडे डोळे करुन पाहिलं त्यांना धडा शिकवून ते गेले, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर एलएसीवर तणाव आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात ते बोलत होते. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे अध्यक्ष व नेते सहभागी झाले होते.

सीमेवर पुरेसे सैन्य तैनात करणे, लष्करी कारवाई करणे आणि हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देण्यासह देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आपले सैन्य सक्षमपणे करीत आहे, असा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांनी दिला.

आपल्या एक इंच जमिनीकडे कोणी डोळे वर करुन पाहू शकत नाही, एवढी क्षमता आज आपल्याकडे आहे.आज भारतीय लष्कर वेगवेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी लढण्यास सक्षम आहे. मागील काही वर्षात सीमा भाग सुरक्षित करण्यासाठी बॉर्डर भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली.

आपल्या लष्कराची गरज असलेली लढाऊ विमाने, आधुनिक हेलीकॉप्टर, मिसाइल डिफेन्स सिस्टम इत्यादीवर आपण भर दिला आहे. नवीन पायाभूत सुविधांमुळे विशेषतःप्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्तीची आपली क्षमता वाढली आहे.पेट्रोलिंग वाढल्यामुळे सावधानता वाढली आहे आणि सीमेवर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

ज्या भागांवर पूर्वी जास्त लक्ष ठेवता येत नव्हतं त्या ठिकाणीही आपले जवान चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून आहेत.आतापर्यंत ज्यांना कोणी विचारत नव्हते, रोखत नव्हते, त्यांनी आता टप्प्याटप्यावर आपले सैनिक रोखत आहेत. त्यामुळे तणाव वाढत आहे, असे मोदी म्हणाले.

सोनिया गांधी यांचे सरकारला रोखठोक प्रश्न

चिनी सैनिकांनी किती तारखेला लडाखमध्ये आपल्या सीमाभागात घुसखोरी केली, घुसखोरी झाल्याचं सरकारला कधी कळालं, पाच 5 मेला याबाबत माहिती मिळाली की त्या आधी, सरकारला नियमितपणे आपल्या देशाच्या सीमाभागातील सॅटेलाइटद्वारे घेतलेली छायाचित्र मिळत नाही का, आपली गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे सरकाला वाटते का, असे प्रश्न काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठकीत उपस्थित केले.

चीनचा प्रश्न मुत्सद्दीपणाने हाताळावा – शरद पवार

गेल्या काही दशकापासून चीन त्यांच्या लष्कराची ताकद वाढवत आहे. लडाख भागात त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य हाती घेतले आहे. पूर्व लडाख सीमा भागात चीनने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात चीन त्यांची ताकद वाढवत आहे. गलवान खोऱ्यातील मोठा भूगाग चीनने व्यापला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा वाद मिटवायचा असेल तर हा विषय मुत्सद्दीपणाने हाताळण्याचा सल्ला राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

डोळे काढून हातात देण्याची भारतात ताकद आहे – ठाकरे

आँखे निकालकर हात में देना, ही भारताची ताकद आहे. आपला भारत मजबूत आहे मजबूर नाही असं वक्तव्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलं आहे. भारताला शांतता हवी आहे याचा अर्थ आम्ही कमकुवत नाही. अवघा देश आपल्या लष्करासोबत आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत उभा आहे ही भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

सर्वपक्षीय बैठकीतून देशात चांगला संदेश – ममता बॅनर्जी 

चीनने हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या निर्णयातून देशात एक चांगला संदेश गेला आहे असं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.

आप, एआयएमआयएम, राष्ट्रीय जनता दलाची नाराजी

आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, एआयएमआयएम या पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत न बोलवण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपचे नेते संजय सिंह यांनी केंद्रात अहंकार असलेलं सरकार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर असदुद्दीन ओवेसी यांनी आमच्या पक्षाला सर्वपक्षीय बैठकीत न बोलवणं हे निराशाजनक असल्याचं म्हणत तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.