Chinchwad News : पिंपरी चिंचवडमधील सर्व पोलीस स्टेशन आयएसओ मानांकित

सहा पोलीस ठाण्यांना A++ मानांकन

एमपीसी न्यूज – स्वच्छता, सुविधा यांसारख्या विविध निकषांवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. आयुक्तालयातील 15 पैकी 6 पोलीस ठाण्यांना तर A++ या दर्जाचे मानांकन मिळाले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन मिळाले. त्याचे प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच एका कार्यक्रमात वाटप करण्यात आले. चाकण, तळेगाव दाभाडे, चिंचवड, हिंजवडी, वाकड, एमआयडीसी भोसरी या पोलीस ठाण्यांना A ++ मानांकन मिळाले आहे. तर काही पोलीस ठाण्यांना A +, A मानांकन मिळाले आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सप्टेंबर 2020 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतला. त्यानंतर सुरुवातीलाच त्यांनी अवैध धंदे आणि व्हाइट कॉलर गुन्हेगारांना सज्जड दम देत मी असेपर्यंत दुसरे धंदे शोधण्याचा सल्ला दिला. त्यानंतरही दारू, जुगार यांसारखे अवैध धंदे, जागा बळकावणे, एमआयडीसी परिसरातील गुन्हेगारी असे प्रकार सुरूच होते. त्यावर पायबंद घालण्यासाठी त्यांनी कठोर उपाययोजना केल्या. त्यामुळे शहरातील अवैध धंदे जवळपास बंदच झाले.

गुन्हेगारी कमी केल्यानंतर आयुक्तांनी पोलीस सेवा सुधारून पोलीस ठाण्यांचा दर्जा वाढविण्याकडे लक्ष दिले. पोलीस स्टेशनची इमारत, त्यात आग रोधक सुविधा, पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी पाणी, शौचालय यांची उपलब्धता अशा विविध निकषांच्या आधारे सुधारणा करण्यास सुरुवात केली.

अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारदारांना चुकीची वागणूक मिळत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा द्वेष वाढतो. यावर उपाय करत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘सेवा’ हा उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये तक्रारदार पोलीस ठाण्यात अथवा चौकीत कधी आला? त्याचे काय म्हणणे आहे? त्याची तक्रार पोलिसांनी ऐकून घेतली का? त्यासाठी त्याला किती वेळ वाट पाहावी लागली? पोलिसांनी दिलेल्या सेवेबद्दल तक्रारदार नागरिक समाधानी आहे का? अशा विविध मुद्द्यांवर आधारित हा उपक्रम आहे.

तक्रारदार पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस तक्रारदाराची माहिती, तक्रार टॅबमध्ये सेव्ह करतील. ती माहिती नियंत्रण कक्षाला मिळेल. ठराविक कालावधीनंतर नियंत्रण कक्षातून संबंधित तक्रारदाराला संपर्क करून त्यांना आलेल्या अडचणी, पोलिसांचे सहकार्य याबाबत विचारले जाईल. त्यानुसार तक्रारदाराला मार्गदर्शन आणि आवश्यक असल्यास पोलीस दलात सुधारणा केल्या जाणार आहेत.

पोलीस स्टेशन मधील भौतिक सुविधा, उत्तम वातावरण आणि आदर्श पोलिसिंग या आधारावर शहर पोलीस दलातील सर्व पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन देखील मिळाले आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या 15 पोलीस स्टेशन आहेत. आणखी तीन पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली असून लवकरच त्यांचे पोलीस स्टेशन म्हणून काम सुरू होणार आहे.

आयुक्तालयातील 15 मधील चाकण, तळेगाव दाभाडे, चिंचवड, हिंजवडी, वाकड, एमआयडीसी भोसरी या पोलीस ठाण्यांना A ++ मानांकन मिळाले आहे. काही पोलीस ठाण्यांना A+ आणि A मानांकन मिळाले आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन आयएसओ प्रमाणित झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.