Pune/Pimpri Unlock news: शहरातील सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, उपहारगृहे, बार आजपासून रात्री दहा वाजेपर्यंत खुली राहणार

All shops, shopping malls, restaurants, bars in the city will be open from today till 10 pm. सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स; धार्मिक स्थळे बंदच राहणार

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व व्यापारी दुकाने, सर्व शॉपिंग मॉल्स, उपहारगृहे, बार आजपासून सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. लोकल ट्रेन सुविधा सुरु केली आहे. तर, सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेक्स, धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी निर्गमित केले आहेत.

आरोग्य सेवा देणारे अधिकारी / कर्मचारी / अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा (डोस) घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच लोकलट्रेन प्रवास अनुज्ञेय करण्यात येत आहे. ज्या कर्मचारी अथवा नागरिक यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यांना लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राच्या आधारे व आस्थापनांच्या ओळखपत्रासह स्वतंत्रपणे राज्यशासनाने ठरवून दिलेल्या यंत्रणेमार्फत विहीत कार्यपध्दतीने (ऑनलाईन ऑफलाईन) प्रमाणित केलेल्या ओळखपत्र धारकानांच लोकलट्रेन प्रवासासाठी मासिक/ त्रैमासिक पास देण्यात यावेत. रेल्वे तिकिट तपासनीस यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल. ज्या प्रवाशांकडे असे ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशांकडून ओळखपत्र खोटे आढळल्यास त्यांच्याकडून तसेच ज्यांनी खोटे प्रमाणपत्र प्रमाणीत केले असेल त्यांच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जाईल.

महापालिका क्षेत्रातील खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. उपहारगृह / बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक सर्व कर्मचा-यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल. ज्या कर्मचा-यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे. असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.

वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे.

सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचा-यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचा-यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. ज्या आस्थापना वरील कर्मचा-यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचा-यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी.
खाजगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 50 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

उद्याने सर्व दिवस विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील. सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस ( Coaching मlasses ) / अभ्यासिका हे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील. या ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण ( किमान एक डोस) अनिवार्य आहे. क्षेत्रिय अधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीप्रमाणे आठवडे बाजार सुरु करण्यास परवानगी द्यावी.

विवाह सोहळे : खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल. या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणा-या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय /हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादित असेल. मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार क्षेत्रीय अधिकारी व त्या क्षेत्रातील संबंधित पोलीस प्रशासन यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निबंधांचे उल्लंघन करणा-यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बँडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधीत सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहील. त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.