Pimpri : कला क्षेत्रात सगळी आयुष्य जगता येतात – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – लहानपणी एखादी गुन्हेगारी घटना घडली की वाटायचे पोलीस व्हावे, पेशंट दिसला की वाटायचं डॉक्टर व्हावे, एखाद्या अपघाताची घटना घडली तर वाटायचं रुग्णवाहिकेचा चालक व्हावे, विविध प्रकारच्या घटना पाहून तसं कुणीतरी बनावं असं वाटायचं परंतु कला क्षेत्राकडे वळल्यावर असे लक्षात आले की कला क्षेत्र हे असे आहे की ज्यात एवढी सगळी आयुष्य जगता येऊ शकतात,  असे मत अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

चिंचवड येथील आहेर गार्डन येथे दिशा सोशल फाऊंडेशनच्यावतीने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यसभेचे खासदार अमर साबळे, उपमहापौर सचिन चिंचवडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक शाम लांडे, समीर मासुळकर, शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, करुणा चिंचवडे, विक्रांत लांडे, अमित गावडे, मोरेश्वर शेंडगे,राजु बनसोडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, महिला काँग्रेसच्या शहराध्यशा गिरिजा कुदळे, दिशाचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राजु गोलांडे, राजु दुर्गे, जितेंद्र ननावरे, दत्ता पवळे, धनंजय काळभोर, उर्मिला काळभोर, बाळासाहेब मोरे, महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, अण्णासाहेब मगर बँक संस्थापक बाळासाहेब गव्हाणे, इंद्रायणी बँकेचे अध्यक्ष  एस. बी. चांडक आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीच्या माध्यमातून शिवाजी महाराज फेम शंतनु मोघे, संभाजी महाराज फेम डॉ.अमोल कोल्हे, झी वाहिनीच्या वरिष्ठ कार्यकारी निर्मात्या सोजल सावंत, मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे यांच्याशी मुक्त संवाद साधला.
डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न मी पाहिले. त्याची दोन कारणे आहेत. प्रथमतः महाविद्यालयात असताना विश्वास पाटील यांची संभाजी ही कादंबरी माझ्या वाचनात आली, त्यामुळे मी भारावून गेलो. आणि दुसरे म्हणजे, डॉ काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेली रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकतील संभाजी महाराजांची भूमिका. ते पाहून संभाजी महाराज अधिकच जवळचे वाटू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली आणि पराक्रमी इतिहास सर्वानाच माहिती आहे. मात्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे श्रेय देण्यात महाराष्ट्र कुठे तरी कमी पडला असा प्रश्न कायम मनात भेडसावत होता.सुरुवातीला नितीन देसाई यांच्या माध्यमातून राजा शिवछत्रपती मालिकेत शिवाजी महाराज यांची भूमिका साकारायला मिळाली. शंभूराजे नाटकातून संभाजी साकारत होतोच. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज या दोन्ही व्यक्तीरेखा वेगवेगळ्या आहेत. छत्रपती संभाजी राजांची भूमिका साकारायची ही खुणगाठ मनाशी पक्की होतीच.

खरं तर ही मालिका उभी राहताना अनेक अडचणी आल्या परंतु मी त्याचे भांडवल करु इच्छित नाही. रसिकांच्या व झी मराठीच्या पाठिंब्यामुळे त्यातून मार्ग काढू शकलो. मालिकेतील सध्या सुरू असलेल्या कथानकाचा संदर्भ देत अमोल कोल्हे म्हणाले, आता कुठे वारा वाहू लागला आहे. छप्पर उचकटून टाकणारे वादळ येण्याचा टप्पा अजुन पुढे यायचा आहे. या विषयासाठी वाहून घेतले आहे. ज्या लढवय्या राजाच्या बलिदानानंतरही अठरा महिने रयतेने लढा दिला तो राजा असामान्यच होता. आज या मालिकेच्या माध्यमातून संभाजी राजांचा खरा इतिहास आम्ही मांडत आहोत. जगभरात सोळा कोटी लोक ही मालिका पाहत आहेत. प्रेक्षकांनी अक्षरशः ही मालिका डोक्यावर घेतली आहे.
सोशल मिडिया ही दुधारी तलवार आहे. त्यावर अनेक मतप्रवाह व्यक्त होत असतात. सर्वांना आपलेसे वाटेल, पटेल आणि रुचेल अशा पध्दतीने आम्ही उपलब्ध पुराव्याच्या आधारे मालिकेची मांडणी केली आहे.
शंतनु मोघे म्हणाले, राजा शिवछत्रपती ह्या मालिकेतून अमोल कोल्हे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका ही एका ठराविक उंचीवर नेऊन ठेवली आहे. अमोल आणि मी खूपदा एकत्र काम केलेलं असल्याने त्यांच्यासमोरच शिवाजी महाराज साकारताना मला दडपण कधी आलं नाही. या भूमिकेला न्याय देऊ शकलो, याचे समाधान आहे.
सोजल सावंत म्हणाल्या, झी वाहिनीने आजपर्यंत मालिकांची निवड करताना मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचे महत्त्व आणि सामाजिक भान जपले आहे. छत्रपती संभाजी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

कार्तिक केंढे म्हणाले, मालिकेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळेच आमचा उत्साह अधिक वाढला असून रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि आशीर्वाद हिच आम्हा सर्वांसाठी उर्जा आहे.
कार्यक्रमाची सुरुवात युवाशाहीर हेरंब पायगुडे यांच्या पोवाडा गायनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. आभार डॉ. शाम अहिरराव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.