Hinjawadi : सर्व वाहतूक एकाच रस्त्यावर आल्याने वाहतुकीची अभूतपूर्व महाकोंडी!

पीएमपीएमएल बसेस वाहतूक कोंडीत अडकल्याने बस स्टॉपवर प्रवाशी अडीच तासापासून ताटकळत

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील संपूर्ण वाहतूक भूमकर चौकाकडे वळविण्यात आल्याने बुधवारी (दि. 11) हिंजवडीमध्ये वाहनांच्या रंगाच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहतुकीच्या या अभूतपूर्व महाकोंडीने दररोज पाऊण तास लागणा-या प्रवासाला (बुधवारी) तब्बल तीन तासांहून अधिक कालावधीत लागला.

हिंजवडी परिसरात बुधवारी (दि. 11) गणेश विसर्जन करण्यात आले. यानिमित्त विविध गणेश मंडळे विसर्जन मिरवणुका काढल्या. या मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग दिले होते. मात्र, हे सर्व पर्यायी मार्ग भूमकर चौकात येऊन मिळत असल्यामुळे अगोदरच वाहतुकीचा ताण असणारा भूमकर चौक आणखीनच गजबजून गेला. त्यात संपूर्ण हिंजवडीमधील वाहतूक याच मार्गावर आल्याने भूमकर चौक तब्बल तीन तास पूर्णतः ठप्प झाला. वाहतुकीचे पूर्ण नियोजन फसल्यामुळे पोलीस यंत्रणेविषयी वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.

हिंजवडी फेज एकमधून हिंजवडीच्या बाहेर पाडण्यासाठी दररोज 45 मिनिटांचा अवधी लागतो. मात्र, वाहतुकीच्या खोळंब्यामुळे तीन तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही वाहने अर्ध्या रस्त्यातच अडकली होती. वाहतुकीच्या कोंडीमुळे आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या कॅब पोहचू न शकल्याने अनेक कर्मचारी कंपन्यांच्या गेटवर अडकून पडले. पीएमपीएमएलच्या चालकांना हिंजवडीमधील वाहतूक बदलाची पूर्ण माहिती नसल्यामुळे या बस रस्त्यावर थांबून होत्या. अखेर बसमधील प्रवाशांनी बसमधून खाली उतरून चालत जाण्याचा मार्ग निवडला.

वाहतुकीच्या महाकोंडीत अडकलेल्या नागरिकांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल मीडियावर हजारो पोस्ट टाकून त्यांचा संताप व्यक्त केल्याचे पहायला मिळाले.

हिंजवडी वाहतूक विभागाने बुधवारी वाहतुकीसाठी बंद केलेले चौक आणि दिलेले पर्यायी मार्ग

# मेझा नाईन हॉटेल चौकाकडून शिवाजी चौकाकडे  येणारे सर्व मार्ग बंद

# कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारे सर्व मार्ग बंद

# इंडियन ऑइल चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारा मार्ग बंद

पर्यायी मार्ग

# फेज दोन, फेज तीनकडून येणारी वाहने टी जंक्शन चौक येथे डावीकडे वळून लक्ष्मीचौक विनोदेवस्ती मार्गे इच्छितस्थळी जातील

# फेज दोन, फेज तीनकडून येणारी वाहने व फेज एककडे जाणारी वाहने जॉमेट्रिक सर्कल चौकातून यु टर्न घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र येथून डावीकडे वळून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छितस्थळी जातील

# फेज एककडून येणारी वाहने मेझा नाईन चौकातून डावीकडे वळून लक्ष्मीचौक, विनोदेवस्ती या मार्गाने इच्छितस्थळी जातील

# इंडियन ऑइल चौकातून माणगाव फेज एककडे जाणाऱ्या वाहने इंडियन ओईल चौकातून उजवीकडे वळून कस्तुरीचौक, विनोदेवस्ती, लक्ष्मीचौक, टी जंक्शन येथून डावीकडे वळून जॉमेट्रिक सर्कल मधून यु टर्न घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र येथून डावीकडे वळून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छितस्थळी जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like