Pune : हॉटेल व्यवसायाला परवानगी, आर्थिक मदत द्या; पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशन रूरलची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने सोशल डिस्टंसींगचे नियम पाळून हॉटेल सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच हॉटेल व्यवसायाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशन रूरल (प्रहार)चे अध्यक्ष बाळासाहेब दाते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

प्रहारकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चौथ्या लॉकडाऊन मध्येही दिलासा न मिळाल्याने पुणे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसाय उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. परप्रांतीय कामगार निघून गेले असून आज ना उद्या हॉटेल सुरू करण्याची परवानगी मिळेल या आशेवर उर्वरित कामगारांना सांभाळण्याची, बसून पगार देण्याची कसरत व्यावसऻयीकांना करावी लागत आहे.

वीज, पाणीपट्टी, भाडे, शासकीय कर द्यावेच लागत आहेत.

पुणे ग्रामीण भागामध्ये 13 तालुके आणि तेवढ्याच नगरपरिषदा आहेत. या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये छोटी-मोठी हॉटेल्स, परमिट रूम, स्नॅक्स सेंटर, खानावळी, चायनीज सेंटर, अमृततुल्य, मिल्क पार्लर, खाद्यगृहे व्यावसायीक चालवीत आहेत.

पुणे ग्रामीण भागामध्ये उपहारगृहांची संख्या सुमारे 10 हजारहून अधिक आहे. यात प्रख्यात मिसळ हाऊसचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाचे दरमहा अंदाजे 100 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

या सर्व हॉटेल व्यवसायांवर स्थानिक तरुण व उद्योजक तसेच जवळपास लाखांच्यावर स्थानिक वा परप्रांतीय हॉटेल कामगारांची व त्यांच्या कुटुंबीयांची गुजराण होत असते.

यातील 80 टक्के परप्रांतीय व इतर जिल्ह्यातील कामगार आपापल्या गावी निघून गेले आहेत. मार्च ते जून हा हॉटेल व्यावसायीकांसाठी सुगीचा काळ असतो. तर जुन ते दिवाळी पर्यंत हॉटेल व्यवसायात काहीशी मंदी असते.

ऐन सुगीच्या काळातच कोरोनाने कहर केला. त्यातच लॉकडाऊन वाढत गेल्याने हॉटेल व्यवसाय उध्वस्त झाला आहे. अनेक हॉटेल्स हे भाड्याच्या जागेत आहेत. त्याचे भाडे, घेतलेल्या कर्जाचे हफ्ते, पाणीपट्टी, वीजबिल शासकीय कर हे द्यावेच लागत आहेत.

हॉटेल्स आज ना उद्या चालू होतील या आशेने उरलेल्या कामगारांना पगार देऊन सांभाळावे लागत आहे.

लॉकडाऊनचा सर्वात वाईट परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. कोरोनाची साथ आल्यापासून हॉटेल बंद आहेत. पुणे ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसायात लाखाच्यावर कामगार काम करत आहेत. त्यातील बहुसंख्य कामगार आपापल्या जिल्ह्यात व आपापल्या राज्यात परत गेले आहेत.

उर्वरित कामगारांना हॉटेल चालू होण्याच्या आशेने पगार देऊन सांभाळावे लागत आहे. हॉटेलचे भाडे, वीज बिल, पाणी बिल, कामगारांचे जेवण खाणे, हॉटेलची साफसफाई, सरकारी कर यांसारखे खर्च मात्र चालूच आहेत.

तसेच या हॉटेल व्यवसायांवर अवलंबून असलेले भाजीपाला, किराणा, मसालेवाले, डेअरी प्रॉडक्ट्स, पापड, चपाती, स्नॅक्स पुरवणारे यांसारख्या छोट्या घटकांवर बेकारीची समस्या आली आहे.

परमिट रूम चालकांचीही हीच परिस्थिती आहे. हॉटेल व्यवसायाला आजवरचा हा सर्वात मोठा आर्थिक फटका आहे. यातून सावरायचे कसे या विवंचनेत हॉटेल व्यावसायिक आहेत.

शासनाने सर्व ग्राहक, विक्रेते व कामगार यांना मास्क, हँड ग्लोव्हज, सॅनीटायझर व सोशल डिस्टंसिंग या आरोग्य चतू:र्सुत्रीचा वापर करून हॉटेल व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी.

हॉटेल व्यवसाय टिकण्यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिल्ह्यातील सर्व हॉटेल व्यावसायिकांकडून होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.