Pimpri : औद्योगिक सुरक्षा कार्यक्रमासाठी अल्फा लावलला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

कंपनीच्या भारतातील कारखान्यांमधील औद्योगिक दुखापतींचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले

एमपीसी न्यूज – दापोडी येथील अल्फा लावल इंडिया कंपनीला सुरक्षा कार्यक्रमासाठी अमेरिकेतील एफएम ग्लोबल कंपनीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे. एफएम ग्लोबल ही औद्योगिक मालमत्ता विमा क्षेत्रातील एक अग्रगण्य जागतिक कंपनी आहे. अल्फा लावलच्या दापोडी प्रकल्पाने कारखान्यात होऊ शकणाऱ्या दुखापतींचे प्रमाण 2015 पासून पन्नास टक्क्यांनी घटविले आहे.

अल्फा लावल इंडिया प्रायवेट लिमिटेडचे संचालक (ऑपरेशन्स) मॅटिअस के. अँडरसन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी कारखाना व्यवस्थापक एस. आर. चिपळूणकर, सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापक संजय मारणे, कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड रजिता कुमार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

येत्या दीड वर्षांमध्ये म्हणजे सन 2020 पर्यंत हे प्रमाण अजून तीस टक्क्यांनी कमी करीत कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेचा दर्जा आखणी उंचावण्याचा कंपनीचा निर्धार आहे. जीवीतहानी आणि दुखापतजन्य कालापव्यय (लॉस टाईम्स इन्ज्युरी- एलटीआय) शून्य राखण्याची आपली परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार केलेल्या अल्फा लावल इंडियाने गेल्या दोन वर्षांमध्ये ठरविलेल्या सुरक्षा उद्दिष्टांपेक्षाहीअधिक चांगली कामगिरी बजावली आहे.

अल्फा लावलने भारतातील त्यांच्या कारखान्यांमध्ये पाणी आणि ऊर्जा बचतीतही लक्षणीय सुधारणा केली आहे. दापोडी प्रकल्पासाठी मान्य करण्यात आलेल्या पाणी वापराच्या सरासरी प्रमाणापेक्षा 35 टक्क्यांनी कमी पाणी वापरण्यात यश मिळविले आहे.  सन 2017-18 या कालावधीत उर्जाबचतीच्या बाबतीत हे प्रमाण पाच टक्के इतके आहे.

अँडरसन म्हणाले की, अल्फा लावलने नेहमीच कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. अल्फा लावलच्या परिसरात येणारे कर्मचारी आणि इतरांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी आणि आल्हाददायी वातावरण निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेतून आमचा आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरणविषयक कार्यक्रम सिद्ध झाला आहे. ‘आम्ही सुखरुप घरी पोहचतो, अगदी दररोज’ हे कंपनीचे या आरोग्य आणि सुरक्षेबाबतचे ब्रीदवाक्य आहे.अल्फा लावलची शाश्वत विकासाच्या मूल्यावर श्रद्धा आहे. पाणी आणि ऊर्जा बचतीबाबत आम्ही मिळविलेले यश हे आमची याबाबतची वचनबद्धता सिद्ध करते, असे श्री. अँडरसन म्हणाले.

अल्फा लावलच्या आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरणविषयक कार्यक्रमाची रुपरेषा सांगताना अँडरसन म्हणाले की, सुरक्षेच्या मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्यशैली स्वीकारत कंपनीने सक्रियपणे एक सुरक्षा संस्कृतीच कंपनीत निर्माण केली आहे. आरोग्य, सुरक्षा आणि पर्यावरण यांच्या संदर्भात सर्वोच्च दर्जा राखण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञान आणि प्रमाणीकरणचा उत्तम मिलाफ घडविण्यात आला आहे. अल्फा लावलच्या जगभरातील कारखान्यांमध्ये सुरक्षा आणि दर्जा या निकषांवर दापोडीचा कारखाना अग्रगण्य मानला जातो. हीट ट्रान्स्फर, सेपरेशन आणि फ्लुइड हँडलिंग या क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित विविध उत्पादने तसेच अभियांत्रिकी सेवा पुरविणारा अल्फा लावल हा जगातील एक अग्रगण्य समूह आहे.

आपल्या ग्राहक कंपन्यांच्या औद्योगिक प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने अल्फा लावलची विविध यांत्रिक उत्पादने, व्यवस्था-प्रक्रिया तसेच सेवा बनविलेल्या असतात. खाद्यान्न,ब्रुवरिज, रसायने आणि पेट्रोरसायने, औषधे स्टार्च, साखर आणि इथेनॉल तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये लागणाऱ्या उष्णता निर्मिती, शीतकरण, विलगीकरण आणि वहन यासारख्या प्रक्रियांमध्ये कंपनीची उत्पादने व सेवा वापरल्या जातात. जहाजांवरील उर्जानिर्मिती, तेल व नैसर्गिक वायुंचा शोध, यंत्र अभियांत्रिकी उद्योग, खाण, सांडपाणी प्रक्रिया तसेच शीतकरण उत्पादने या उद्योगक्षेत्रांमध्येही कंपनीने बनविलेली उत्पादने वापरली जातात. जगभरातील सुमारे शंभर देशांमध्ये पसरलेल्या आपल्या अनेक ग्राहक कंपन्यांना जागतिक स्पर्धेत पुढे राहण्यात मदत करण्यासाठी अल्फा लावल समुह कार्यरत असतो. नॅस्डॅक ओएमएक्समध्ये नोंदणीकृत असलेल्या अल्फा लावलने २०१७ मध्ये ३५.३ अब्ज स्वीडीश क्रोनर (सुमारे ३.६ अब्ज युरो) इतक्या किमतीच्या उत्पादन व सेवांची विक्री केली. कंपनीमध्ये सुमारे १६,४०० कर्मचारी आहेत.

अल्फा लावल कंपनी भारतात १९३७ पासून कार्यरत आहे. सेंट्रीफ्युगल सेप्रेटर्स, डिकॅन्टर्स आणि फ्लो इक्विपमेंटस् तयार करणारे कंपनी समुहाचे उत्पादन केंद्र म्हणून भारतातील या केंद्राचे विशेष महत्त्व आहे. समुहाच्या जगभरातील विविध विक्री कंपन्यांच्या माध्यमातून या उत्पादनांची विक्री केली जाते.

भारतातील खाद्यप्रक्रिया, तेल व नैसर्गिक वायू, उर्जानिर्मिती, पोलाद व धातु, साखर, औषधनिर्मिती, कागद व लगदा निर्मिती, खाद्यतेले प्रक्रिया, डिस्टीलरी, ब्रुवरी, स्टार्च, इनऑर्गेनिक,मरिन आणि इफ्लुअंट हँडलिंग आदी विविध उद्योगांमध्ये कंपनीची उत्पादने व प्रक्रिया यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.