Talegaon Dabhade : नारळाच्या कवटीवर साकारली शेलारवाडी येथील अमरदेवी माता

एमपीसी न्यूज – शेलारवाडी येथील अमरदेवी माता चक्क नारळाच्या कवटीवर साकारली आहे. नारळाच्या कवटीवर साकारलेले अमरदेवीचे रूप पाहून अनेक भक्त आनंद व्यक्त करीत आहेत. ही किमया निगडी येथील अनुजा चैतन्य जोशी ( कुलकर्णी ) यांनी केली. अनुजा यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असून त्या कलेतून त्यांनी ही कलाकृती साकारली आहे.

निगडी येथील अनुजा चैतन्य जोशी ( कुलकर्णी ) यांनी नारळाच्या कवटीवर हुबेहुब अमरदेवी माता साकारली आहे. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असणाऱ्या अनुजा यांनी अथक मेहनत घेऊन आपली ही सुंदर कला जोपासली आहे. यापूर्वी त्यांनी बेलाच्या पानावर महादेवाचे, आंब्याच्या पानावर गुढीपाडव्याचे, केळीच्या पानावर प्रभू रामचंद्रांचे,रुईच्या पानावर हनुमानाचे चित्र काढून अनेकांची वाहवा मिळवलेली आहे.

गणेशोत्सवाच्या काळातही त्यांनी छोट्याशा सुपारीवर गणपतीचे पेंटिग साकारले होते.कलेप्रती असणारी आवड, प्रचंड मेहनत व कुटुंबियांची साथ यातून हे साध्य झाले आहे असे अनुजा यांनी सांगितले. देहुरोड व मावळ परिसरात अमरदेवी मातेचे भक्तगण अधिक असल्याने देवी थेट नारळाच्या कवटीवर रेखाटण्याचा संकल्प त्यांनी केला व शासकीय आदेशाप्रमाणे प्रत्यक्ष दर्शन सुरु झाल्यानंतर मंदिरात येऊन तो पुर्णत्वास नेला.

नारळाच्या कवटीवर साकारलेले अमरदेवी मातेचे चित्र पाहून अनेक भक्तांनी आनंद व्यक्त केला. नारळाच्या कवटीवर साकारलेल्या अमरदेवी मातेला पाहून सोशल मिडीयावरही कौतूकाचा वर्षाव झाला.

अनुजा यांनी ही कला सतत जोपासावी व भविष्यात अधिकाधिक यश संपादन करावे अशी अपेक्षा शेलारवाडी येथील अमरदेवी मातेचे भक्त सतिश भेगडे व उमेश माळी यांनी व्यक्त केली तसेच देवीची मुर्ती हुबेहूब साकारणे ही कला अभिजात असून ती दैवी देणगी आहे अशी प्रतिक्रिया राजू भेगडे, विशाल जोशी व संतोष शेलार यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.