Mumbai : अशोक आणि निवेदिता सराफ यांच्याकडून  मुंबई पोलिसांना आमरस-पुरीचे जेवण

Aamaras-Puri meal from Ashok and Nivedita Saraf to Mumbai Police

एमपीसी न्यूज – सध्याच्या या करोनाकाळात डॉक्टर, नर्सेसच्या बरोबरीने पोलीस कर्मचारी प्राणाची बाजी लावून काम करत आहेत. त्यातील अनेकांना आपले प्राणदेखील गमवावे लागले आहेत. पण ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन ड्यूटी करणा-या पोलिसांचे आपण कौतुक केलेच पाहिजे, ही भावना मनात ठेवून मराठी चित्रपटसृष्टीचे मामा म्हणजे अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पोलिसांना चक्क आमरस पुरीचे जेवण दिले.

सराफ दाम्पत्य लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात. हा भाग ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्याशी संपर्क साधत अशोक आणि निवेदिता सराफ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आमरस पुरीचं जेवण द्यायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. पोलीसांकडून परवानगी मिळताच सर्व कर्मचाऱ्यांसाठी आमरस पुरीचं जेवण तयार करत स्वतः निवेदिता सराफ पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.

‘सध्याच्या खडतर परिस्थितीत तुम्ही जे काम करत आहेत, ते कौतुकास्पद आहे. तुमच्याबद्दल मनात कायम आदर होताच आणि आता तो द्विगुणित झालाय ‘, अशा शब्दांत सराफ दाम्पत्याने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या सहृदय कृतीने सोशल मिडियावर देखील त्यांचे कौतुक होत आहे.

मे महिना म्हटलं की मराठी माणसाला हटकून आमरस पुरीची आठवण होणारच. पण आपल्या ड्यूटीवर गुंतलेल्या पोलिसांना सध्या तरी साधे जेवण मिळाले तरी खूप असे म्हणायची वेळ आली आहे. दादा कोंडके यांच्या ‘पांडु हवालदार’ या चित्रपटात पोलिसाची अजरामर भूमिका साकारलेल्या अशोकमामांनी पोलिसांना आमरस पुरीचे जेवण देऊन अशी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या या कृतीने त्यांनी रसिकांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.