Amarnath Yatra Diary: बाबा अमरनाथ यात्रा – एक सुखद व अविस्मरणीय अनुभव

Amarnath Yatra Diary by Sushil Dudhane: Baba Amarnath Yatra - a pleasant and unforgettable experience अमरनाथ यात्रा म्हणजे आनंदानुभवाबरोबरच अविस्मरणीय थरार

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात ‘एमपीसी न्यूज’चे वाचक सुशील दुधाणे यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या अमरनाथ यात्रेच्या आठवणींना उजाळा दिला. वाचूयात त्यांच्या अमरनाथ डायरीतील प्रवासवर्णन!

_MPC_DIR_MPU_II

भोले कि शादी मै, कश्मीर के वादि मै…

अन्नपूर्णा,नर्मदा परिक्रमा, चार धाम यात्रा, कर्दळीवन, अशा अनेक यात्रा भाविक मंडळी वर्षभरात आपआपल्या सोयीने करीत असतात. अशीच एक अवघड व शरीराची कस पाहणारी, शारीरिक तंदुरुस्तीची तपासणी पाहणारी बाबा श्री अमरनाथ यात्रेचे आयोजन श्रीकांत देवधर व यशवंत साळुंखे (सातारा) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. तशी ही त्यांची 16 वी अमरनाथ यात्रा पण आमची पहिली!

अनेक वेगवेगळ्या भागातील यात्रेकरूंचा यात समावेश होता, कोणी सातारा, रहिमतपूर, वाई, बोरगाव, मुंबई व पुणे या ठिकाणांहून सामील झाले होते. जवळपास 61 जणांचा एक विशाल जनसमुदाय जमला. वय वर्ष 26 ते वय वर्ष 70 सर्व वयोगटातील ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ यांचा समावेश होता.

दिनांक 2 जुलै 2017 ला रात्री 9.15 वाजता मुंबई सेंट्रल येथून गोल्डन टेम्पल एक्सप्रेसने प्रवासास सुरुवात केली. 4 जुलै रोजी पहाटे 6 वाजता आम्ही अमृतसर येथे जवळपास 1900 किलोमीटरचा प्रवास करून पोहचलो. आम्ही सुवर्ण मंदिराच्या परिसरातील भक्तनिवास येथे मुक्काम केला व सुवर्ण मंदिर दर्शन घेऊन, जालियनवाला बाग या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली.

वाघा बॉर्डरवर देशभक्तीला उधाण 

त्यानंतर शेरावली गेटपासून बसने भारत-पाक सीमेवरील ‘वाघा बॉर्डर’ या ठिकाणी लष्कराची सूर्यास्त कवायतीला हजेरी लावली. दोन्ही देशांच्या सैनिकांनी आपआपली कवायत सादर केली. एकच देश प्रेम येथे ओसंडून वाहत होते, ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’, ‘शिवाजी महाराज की जय’ अशा विविध नामघोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला.

पाच जुलै सकाळी 6.30  वाजता अमृतसर येथून पुढील प्रवासास  निघालो. गुरुदासपूर, पठाणकोट, लखनपूर येथे चेकिंग झाल्यावर पुढचा बस प्रवास चालू झाला व त्यानंतर जम्मू येथील भगवतीनगर या यात्रेच्या बेस कॅम्प येथे मुक्कामाला थांबलो.

पहाटे ४  वाजता सकाळी बसने प्रवास पहलगामच्या दिशेने सुरु झाला. 300 किलोमीटरचा हा एकमेव डोंगरातील घाटमार्ग पार करावा लागतो. वाटेत आम्हाला बगली धरण, रामबण, बनिहाल ही गावे लागली. 1956 साली बांधलेला सुप्रसिद्ध असा 2.5 किलोमीटर लांब जवाहर बोगदा लागतो. हा भारतातील सर्वात जुना व लांब बोगदा आहे.

त्यानंतर आत्ताच नव्याने झालेला ‘चान  नि नाचरी’  हा नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा लागतो. हा पार केल्यावर आपण काश्मीर खोऱ्यात प्रवेश करतो, अनंतनाग येथून उजवीकडे वळून पहलगाम या लीडर नदीच्या काठावर वसलेल्या निसर्ग सुंदर गावात हॉटेल नूरमहाल येथे मुक्कामाला पोहचलो.

पिस्सु टॉपची खडी चढण 

यात्रेत चार दिवसांच्या प्रवासासाठी लागणारे साहित्य सॅकमध्ये भरून, 7 जुलै रोजी पहाटे 6 ला पहलगाम येथून सुमो गाडीने तासाभराच्या अंतराने  चंदनवाडी येथे पोहचलो. पास दाखवून चंदनवाडी गेट एंट्रीमधून यात्रा व्हॅलीमध्ये प्रवेश केला. प्रथमच यात्रेमधील अवघड समजला जाणारा पिस्सु टॉपची खडी चढण पार करावी लागली. त्यानंतर मार्गात आम्हाला जोजीवल,नागा कोटी व नंतर शेषनाग अश्या विविध भागातून मार्गक्रमण करीत जावे लागले.

जवळपास 12 किलोमीटरचे अंतर सात तासांच्या अथक पदभ्रमण करून शेषनाग येथे मुक्कामाच्या जागी विराजमान झालो. पेटपूजा करून सर्वजण झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी 8 जुलैला पहाटे सहा वाजता सर्व जणांनी पदभ्रमण चालू केले. आज सर्वजणांची शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध करण्याची  खरी कसोटी होती,  कारण या मार्गात आम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवणार होती. तसेच अनेक लहान , मोठ्या चढ उताराचा भाग पार करावयाचा होता.

आजची यात्रा शेषनाग येथून सुरु झाली बारबाल,महागुणास टॉप,पाबिबल,पोषपत्रि करून पंचतरणी येथे 12 किलोमीटर व नऊ तासांचे पद्भ्रमण करून पोहचलो. या यात्रेतील सर्वात उंच समजले जाणारे  ठिकाण महागुणास टॉप, समुद्र सपाटीपासून हे 14,500 फूट उंचीवर आहे. या येथे ऑक्सिजनची कमतरता जाणवते. खूपच थकवा आणणारा असा हा भाग आम्ही सर्वांनी यशस्वीपणे पार केला.

जय बाबा बर्फानी, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय भोले अशा विविध नामांचा जयघोष करीत आम्ही पंचतरणी येथे विश्रांतीसाठी मुक्कामी पोहचलो. आज सर्वांची खूप दमछाक झाली असल्याने, लवकर पेटपूजा उरकून झोपी गेलो.

थकलेल्या पावलांना बासरीच्या मधुर सुरांमुळे बळ  

नऊ जुलै रोजी आमचे पुढील  पदभ्रमण चालू झाले, ज्या दिवसाची आम्ही सर्व जण आतुरतेने वाट पाहत होतो, तो दिवस आज उजाडला होता. दोन दिवसांच्या अथक परिश्रमाने सर्वांना थकवा जरी आलेला असला, तरी त्याच उत्साहाने अंगात एक नवीन ऊर्जा संचारून व सोबतीला यशवंत साळुंखे यांच्या बासरीतून मधुर गाण्याची धून अधून मधून ऐकू येत होती. त्यामुळे आमचे पुढील अंतर भराभर पार करत आम्ही मार्गस्थ होत राहिलो.

पहिलाच तीन किलोमीटरचा कस पाहणारा अवघड व नागमोडी संगम टॉपचा टप्पा पार करीत, 6 किलोमीटरचे पदभ्रमण व 3 तासांच्या अथक परिश्रमांनंतर आम्ही सकाळी 9 वाजता बाबा बर्फानी यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. आज दर्शन घेण्याचा दुग्धशर्करा योग होता. आज गुरुपूर्णिमा असल्यामुळे बाबा बर्फानींचा आशीर्वाद घेऊन 10 वाजता परत परतीच्या प्रवासास सुरुवात केली.

सहा किलोमीटर अंतर पार करून आम्ही परत पंचतरणी येथे पोहचलो. येथे  पेटपूजा करून दुपारी तीन वाजता आम्ही पंचतरणी ते चंदनवाडी हे 30 किलोमीटरचे अंतर घोड्यावर बसून पार करण्याचा निर्णय घेतला. तसे आम्ही कसलेले ट्रेकर्स मंडळी, परंतु आमच्या ग्रुप मधील महिलांची खूपच दमछाक झाल्याने त्यांना पायी प्रवास करणे शक्य नव्हते.

घोड्यावरच्या प्रवासाचा थरार

विशेष बाब म्हणजे माझ्या बायकोचा (सीमाचा) हा पहिलाच मोठा ट्रेक (जवळपास 36 किलोमीटर अंतराचा) तिने कोणताही त्रास न होता लीलया पार केला. परंतु शरीराला अधिक त्रास न देता आम्ही आठजणांनी हा निर्णय  घेतला व आमचा प्रवास घोड्यावर बसून चालू झाला.

मी प्रथम घोड्यावर बसण्याचा योग लग्नाच्या वेळेस 1993 साली आला होता. त्यानंतर आज जवळपास 23 वर्षानी पुन्हा हा योग आला, परंतु या वेळेस हा योग बाबा अमरनाथ यात्रेसाठी आला. आमच्या ग्रुपमधील बऱ्याच जणांचा घोड्यावर बसून प्रवास करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात धागधूग होती. घोडा आपणाला चंदनवाडी पर्यत व्यवस्थित घेऊन जाईल ना, ही शंका सतत येऊ लागली.

सुरुवातीला खूप भीती वाटत होती नंतर भीती हळू-हळू कमी होऊ लागली. अनेक चढ-उतार पार करीत, काही ठिकाणी जेथे घोडे जाऊ शकत नव्हते,  त्या ठिकाणी घोड्यावरुन खाली उतरून पायी जावे लागत होते. काही तासानंतर आमची खरी सत्त्वपरीक्षा सुरु झाली, रात्री आठ वाजता अचानक ढग भरून आले  व काळाकुट्ट अंधार झाला व अंधारातच आम्ही पिस्सु टॉपचा तीन किलोमीटरचा अवघड उताराचा भाग पार करण्याचे आव्हान आमच्यासमोर उभे राहिले.

तसे पाहिले तर आम्ही हे अंतर स्वतः पार करणार नव्हतो, ते तर घोड्यावर बसूनच पार करणार होतो, परंतु एक बाजूला बघितले तर खोल दरी दिसत होती, हा सर्व मार्ग घोडा अंधारातच पार करत होता. परंतु मनात खूपच भीती वाटत होती जिथे आम्हाला चक्क दाट अंधार दिसत होता, बाकी काहीच दिसत नव्हते. आमची अवस्था खूपच बिकट झाली होती, मग काय आमच्या सोबत असलेल्या महिलांनी सर्व देवांचा नामघोष सुरु केला.

कोणी स्वामी समर्थ, कोणी जय भोले, साई बाबा, ओम नमः शिवाय… नाम घोष सुरूच होता, यातच भर पडली ती वरुणराजाची! त्याचे आगमन झाले, मग काय म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना,  अशी आमची अवस्था झाली. आधीच अंधार, त्यात पाऊस, मग काय हुडहुडी भरून आली. संपूर्ण अंग ओलेचिंब झाले. या सर्व अचानक आलेल्या नैसगिक आपत्तीवर मात करीत आम्ही 24 किलोमीटरचे अंतर घोड्यावर बसून आठ तासांत पूर्ण करून चंदनवाडी येथे रात्री साडेनऊला पोहचलो.

दहशतवादी हल्ल्याचे सावट 

सर्वाना खूपच थकवा आलेला होता. येथून पुढचा प्रवास आम्ही जीपने पार करून पहलगाम येथील हॉटेलात मुक्कामास पोहचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही पहलगाम परिसर संपूर्ण फिरलो व रात्री परत मुक्कामासाठी हॉटेलात आलो. रात्री नऊनंतर बऱ्याच जणांना घरून फोन येऊ लागले. ताबडतोब घरी या, श्रीनगर येथे यात्रेकरूंच्या गाडीवर अतिरेक्यांनी फायरिंग केले आहे  व यात सहा निष्पाप यात्रेकरू मारले गेले आहेत. अशा बातम्यांनी आम्ही सर्वजण घाबरून गेलो.

खरं तर उद्या आमचा रेस्ट डे होता, परंतु पारिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आम्ही जम्मूला पहाटे लवकर उठून जाण्याचा निर्णय घेतला व निघालो. वाटेत प्रचंड मिलिटरी बंदोबस्त होता, पावला-पावलावर जवान उभे होते, त्यांना बघून मनातील भीती दूर होत होती. सलाम त्यांच्या कार्याला, नमन भारत मातेला, नमन अशा सैनिकांच्या मातेला, ज्यांनी या शूर सैनिकांना भारत मातेच्या रक्षणासाठी व आमच्या ही रक्षणासाठी जन्म दिला.

जे स्वतःच्या परिवाराला सोडून आमची रक्षा करीत होते. आम्ही थेट जम्मू गाठले व माता वैष्णवी देवीचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी, आम्ही अमृतसर गाठले व तेथून मुंबई, पुणे प्रवास करून घरी सुखरूप पोहचलो. अशा पद्धतीने आनंदी वातावरणात व थोड्या फार भीतीच्या दडपणात आम्ही 15  दिवसांची, 5,300 किलोमीटरची पुणे ते पुणे यात्रा पूर्ण केली.

या संपूर्ण यात्रेत सातारा येथील रहिवाशी कदम तसेच पुण्यातून सहभागी झालेले यात्रेकरू आप्पा जगताप, सुनील बलकवडे, शशी उत्तेकर, सुनील ताम्हाणे, पारुल मोता, सीमा दुधाणे, वंदना बलकवडे व मी सुशील दुधाणे यांचा विशेष सहभाग होता.

भुके को अन्न,

प्यासे को पानी!

जय भोले बाबा बर्फानी!!

!! भोले कि फौज, करेगी मौज!!

– सुशील दुधाणे 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.