Ambegaon : पेठ येथे एका विहिरीमध्ये आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारावरील पेठ येथे एका विहिरीमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेठ येथील पोलीस पाटील सविता माठे यांनी मंचर पोलिस स्टेशनला याबाबत खबर दिली आहे, दुपारी तीनच्या आसपास पुणे नाशिक महामार्गावरील पेठ येथील हॉटेल अजिंक्यच्या पश्चिम दिशेला अडीचशे फुट अंतरावर शाळेपासूनजवळ असणाऱ्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह आढळून आला.

ही माहिती मिळताच मंचर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले पोलीस नाईक चंद्रशेखर डुंबरे, बीट जमादार कैलास कड, पोलीस कॉन्स्टेबल रामदास तनपुरे, होमगार्ड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अशोक राक्षे,बाळासाहेब गुंजाळ, सोमनाथ गायकवाड ,उमेश काळे, शरद पवार, स्वामी माठे या ग्रामस्थांच्या साह्याने दोरीची झोळी करून कुजलेला मृतदेह बाहेर काढला. ही विहीर रामजी सदाशिव गुंजाळ यांच्या मालकीची आहे. या इसमाचा पाच ते सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.