Ambi : डंपर चालकांनी मानसिक संतुलन ढळू न देता वाहन चालवावे- निलीमा जाधव

एमपीसी न्यूज- अपघातामुळे एका व्यक्तीच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. अपंगाच्या जगण्याला आधार राहत नाही. याचा विचार चालकांनी गाडी चालवताना गांभीर्याने करावा. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त निलीमा जाधव यांनी केले. आंबी येथे मावळ तालुका खाण व क्रशर उदयोजक संघ आणि पिंपरी चिंचवड वाहतूक नियंत्रण शाखेच्या संयुक्त विदयमाने अवजड वाहतूक करणारे चालक मालक यांच्यासाठी सोमवारी (दि. 10) रस्ते वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातविरहीत वाहतुकीसाठी उपाययोजना या विषयावर आयोजित मार्गदर्शन शिबिरात निलीमा जाधव बोलत होत्या.

यावेळी देहुरोड तळेगाव वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश पवार, उपनिरीक्षक किशोर यादव, एमआयडीचे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, स्टोन क्रशर संघटनेचे अध्यक्ष विलास काळोखे, माजी परिवहन अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग आणि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

नीलिमा जाधव म्हणाल्या, ” बरेच अपघात रस्त्यावर उभ्या वाहनांना धडकून होतात त्यामुळे रिफ्लेक्टर आणि पार्किंग लाईट लावणे गरजेचे आहे. चालकांनी मानसिक संतुलन ढळू देऊ नये. मालाने भरलेल्या गाडीचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. दंडात्मक कारवाईपेक्षा चालकांना वस्तूस्थिती काय आहे ? हे समजावल्यास फरक पडेल” सेंट्रल चौक, सोमाटणे फाटा, लिंब फाटा आदी ठिकाणी लवकरात लवकर अपघातरोधक उपाययोजना करण्यासाठी पोलिसांकडून रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश पवार म्हणाले, “डंपर नेटने अच्छादीत करणे बंधनकारक आहे. अपघात झाल्यास चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊन सात ते दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रश सॅन्ड डंपर उघडे न ठेवता पाणी मारुन नेटने आच्छादीत करणे बंधनकारक आहे” अन्यथा कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी डंपर चालक-मालकांना दिला.

माजी परिवहन अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग यांनी मार्गदर्शन केले. वडगाव फाटा ते आंबी दरम्यान असलेल्या अवैध दारु धंदयावर कारवाई करण्याची मागणी संघातर्फे करण्यात आली. खुद्द स्टोन क्रशर मालकांनीच बेफाम डंपरचालकांना ठोकून काढण्याची पोलिसांना विनंती केली.

पार्वती नेत्रालयातर्फे डॉ. अशोक दाते यांच्या पथकाने चालकांसाठी नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. प्रा. महादेव वाघमारे यांनी विनोदातून वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा याविषयी वाहन चालकांना मार्गदर्शन केले.

विक्रम काकडे यांनी सूत्रसंचालन केले. संघाचे किरण काकडे, श्रीकांत वायकर, सचिन काळोखे,संतोष घोलप, शंकर पवार, गोरख शेटे, राजेंद्र म्हाळस्कर प्रदीप कलावडे, समीर कोयते, सुधाकर शेळके आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सूत्रसंचालन उद्योजक विक्रम काकडे यांनी केले. उद्योजक श्रीकांत वायकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.