Amboli : राजकीय नेते, पत्रकार अन् नागरिकांच्या सहभागामुळे रंगले ‘राजकीय इर्जिक 2019’

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती करण्यासाठी किमया कम्युनिकेशन्स या संस्थेने आयोजित केलेले ‘राजकीय इर्जिक 2019’ विद्यमान खासदार, विविध राजकीय पक्षांचे नेते, ज्येष्ठ पत्रकार आणि नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे चांगलेच रंगले.

खेड तालुक्यातील आंबोली गावातील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात किमया कम्युनिकेशन्स या संस्थेने ‘राजकीय इर्जिक 2019’ या परिसंवादात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी स्वराज अभियानाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मानव कांबळे होते.

  • या कार्यक्रमात खासदार शिवाजीराव आढळराव, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंगलदास बांदल, पुणे जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते विठ्ठल आवाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जयप्रकाश बांदल, एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, द डेमोक्रॅटिक पोस्टच्या संपादिका स्नेहल वरेकर, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, किमया कम्युनिकेशन्सचे संचालक प्रा. जयंत शिंदे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

यावेळी हेमंत देसाई यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या ध्येय-धोरणांवर कडाडून टीका केली. सीबीआय, न्यायालय आणि यासारख्या संस्थांमधला सरकारचा वाढता हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक आहे, असे ते म्हणाले. राफेल संदर्भातली सरकारची संशयास्पद भूमिका, जीएसटी अंमलबजावणीतील गोंधळ आणि नोटाबंदीमधील सपशेल अपयश आणि एकूणच मंत्रिमंडळातील सामूहिक निर्णयाचा अभाव यामुळे सरकारची कामगिरी झाकोळून गेली आहे. माध्यमांना आपल्या बाजूने करण्याचा नादात सरकार जनतेचा कानोसा घेण्यात कमी पडले आहे, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी मानव कांबळे म्हणाले, धार्मिक तेढ-जातीयता यामुळे संविधानाच्या ढाच्याला धक्का लागत आहे. शेतकरी,कष्टकरी आणि वंचितांना या सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे. त्यामुळे लोक सत्तापरिवर्तनाच्या मानसिकतेला आले आहेत.

राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन आपण समाज हितासाठी, पूर्वांपार चालत आलेली इर्जिक संस्कृती जपली पाहिजे. परस्पर सहकार्याची भावना जोपासण्यासाठी आजही खेडेगावांबरोबरच शहरातही इर्जिकची गरज आहे, असे मत कुचिक यांनी व्यक्त केले.

  • त्यानंतर खासदार आढळराव पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांचा लेखा-जोखा मांडला. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवर लढवली गेली पाहिजे. सरकारच्या कामगिरीवर मतदान झालं पाहिजे. मतदारसंघातील कारखानदारीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. स्थानिकांना अधिकाधिक रोजगार मिळावा म्हणून मी प्रयत्नशील आहे. पुणे नाशिक-रेल्वेचा प्रश्न मार्गी लागला आहे. भीमाशंकर-मुंबई रस्त्यासाठी काही प्रमाणात आर्थिक तरतूद केली आहे. वनविभागाच्या काही अटी-शर्थींचा निपटारा झाल्यावर तोही मार्गी लागणार आहे. अर्थात अशा प्रकल्पांना मोठा कालावधी लागत असल्याने, जनतेचा रोष मी समजू शकतो. तांत्रिक कारणांमुळे विमानतळ झाले नाही. पेटा कायद्यामुळे बैलगाडा शर्यत सुरु होण्यात अडथळे आले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

मंगलदास बांदल यांनी त्यांच्या खास शैलीत श्रोत्यांशी संवाद साधला. भीमाशंकर-मुंबई रस्ता आणि शेतीला पाणी असे मोठे प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती आहे. मात्र, त्यासाठी मोठी जबाबदारी जनतेने दिली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  • देशाच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचे ऐतिहासिक योगदान आहे. त्यामुळे ७० वर्षांत काँग्रेसने काय केले? हा प्रश्न निरर्थक आहे, असे मत
    विठ्ठल आवाळे यांनी व्यक्त केले. जयप्रकाश परदेशी, विवेक इनामदार, स्नेहल वरेकर, अरुण बोऱ्हाडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमामागील भूमिका विषद करताना प्रा. जयंत शिंदे म्हणाले की, मोठ्या कृषी हंगामात काळ-वेळ-मनुष्यबळाचं नियोजन करत शेतकरी एकत्र येत समूह शेतकीचं इर्जिक घालतात. परस्पर संपर्क-संवाद आणि सहकार्याच्या जोरावर एकमेकांच्या सहकार्याने हंगाम पार पाडतात. सामाजिक सौहार्द जपणारे कृषी संस्कृतीतले हे इर्जिक राजकीय संस्कृतीत यावे, यासाठी किमया कम्युनिकेशन्स राजकीय इर्जिक २०१९ यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून संवादी आणि समन्वयवादी भूमिका पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

  • निवडणुकीच्या काळात राजकीय स्पर्धेतून गावोगावी गट-तटाच्या राजकारणातून सामाजिक सलोखा बिघडतो. तो बिघडू नये म्हणून सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणून आपापली भूमिका मांडण्याची संधी देता यावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी अरुण बोऱ्हाडे यांनी समन्वय साधला. माधुरी गोडांबे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.