America Election : व्हाइट हाउस सोडण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ही’ अट !

एमपीसी न्यूज – अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अखेर व्हाइट हाउस सोडण्यासाठी तयार झाले आहेत पण, त्यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे. या अटीप्रमाणे जर इलेक्टोरल कॉलेजकडून जो बायडन यांना अधिकृतपणे विजेते म्हणून घोषणा करण्यात आली तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार असल्याचे विधान ट्रम्प यांनी केले आहे.

निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प गुरूवारी माध्यम प्रतिनिधींसमोर आले. यावेळी त्यांनी ही अट ठेवली. तसेच या निवडणुकीत उच्च स्तरीय घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसंच, जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना विजेता म्हणून घोषित केले तर ती त्यांची मोठी चूक ठरेल असेही ट्रम्प म्हणाले.

अलिकडेच झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणुकीत आपला पराभव होत आहे, हे लक्षात येताच त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता व्हाइट हाउस सोडण्याबाबत ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केले आहे.

दरम्यान, इलेक्टोरल कॉलेजकडून मतांवर अखेरचा निर्णय घेण्यासाठी पुढील महिन्यात बैठक घेण्यात येणार आहे. 14 डिसेंबर रोजी अमेरिकी इलेक्टोरल कॉलेज बायडन यांच्या विजयाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.