Pimpri : अमित गोरखेच होणार आमदार; शहरातील दिग्गज भाजप नेत्यांची खात्री

माजी खासदार अन विद्यमान आमदार यांच्या खुसखुशीत भाषणातून अमित गोरखे यांच्यावर शब्दसुमनांचा वर्षाव

एमपीसी न्यूज – नॉव्हेल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष अमित  गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राजकीय मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव करत कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमात शहरातील दिग्गज नेत्यांनी अमित गोरखे यांच्यावर शब्दसुमने उधळली. त्यात माजी खासदार गजानन बाबर आणि विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत अमित गोरखेच आमदार होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी अमित गोरखे यांचे पिंपरी विधानसभेतून नाव निश्चित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिंचवड येथे अमित गोरखे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव, माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, माजी उपमहापौर शैलजा मोरे, राहुल सोलापूरकर, पक्षनेते एकनाथ पवार, संदीप जाधव, राजू दुर्गे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

माजी खासदार गजानन बाबर म्हणाले, “अमित गोरखे घरातला माणूस आहे. मी नगरसेवक केवळ अमित गोरखे यांच्यामुळे झालो. कुठलेही भांडवल आणि पाठिंबा नसताना एवढे मोठे काम करणे खूप महत्वाचे आहे. असे प्रामाणिक कार्यकर्ते पक्षाला मिळणे हे पक्षाचे भाग्य आहे. त्यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. गोर गरीब जनतेची सेवा करणे, हाच त्यांचा ध्यास आहे. गरिबी जवळून पाहिल्यामुळे त्यांना त्याची जाण आहे. अमित गोरखे पुढील विधानसभा निवडणुकीत आमदार होणार”

आमदार लक्ष्मण जगताप, “अमित गोरखे यांनी वर्तमान पत्र वाटण्यापासून ते डिग्री वाटण्यापर्यंत सर्व काम केलं आहे. प्रामाणिक काम करत त्यांनी यश मिळवले आहे. समाजकार्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. भविष्यात यापेक्षा अधिक जोमाने काम करण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत. अमित गोरखे यांना आमदारकीचं तिकीट मिळण्यासाठी आम्ही सर्वजण पालकमंत्र्यांकडे आग्रही राहू, तसेच सर्वजण अमित गोरखे यांच्या पाठीशी उभे राहू.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.