Pune: वनराई संस्थेच्या सचिवपदी अमित वाडेकर यांची निवड

amit wadekar elected as secretary of vanrai organisation

एमपीसी न्यूज- पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या आणि देशभर कार्यविस्तार असलेल्या ‘वनराई’ संस्थेच्या सचिवपदी अमित वाडेकर यांची नुकतीच निवड झाली आहे.

अमित वाडेकर यांनी समाजशास्त्र आणि पत्रकारिता या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेले असून मानव अधिकार, लिंगभाव अध्ययन, सहकार व्यवस्थापन इत्यादी विषयांचेही त्यांनी अध्ययन केलेले आहेत.

संशोधनाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या टाटा समाजविज्ञान संस्था (TISS), मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), पुणे अशा शैक्षणिक संस्थांनी सामाजिक समस्यांवर हाती घेतलेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये संशोधनात्मक काम करून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.

त्यांनी बंगलोर येथील सेंटर फॉर बजेट अँड पॉलिसी स्टडीज या संस्थेच्या माध्यमातून नगरपालिकांच्या क्षमता बांधणीच्या प्रकल्पावर समन्वयक म्हणून काम पाहिले.

गेली दहा वर्षे ते वनराई संस्थेच्या माध्यम व प्रकाशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असून, वनराई मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात वनराई मासिकाला वीसहून अधिक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

वनराई संस्थेमार्फत पुण्याजवळ पिरंगुट गावासाठी राबवण्यात येणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 4 आदिवासीबहुल गावांमध्ये राबवण्यात येणारा शाश्वत ग्राम विकास प्रकल्प, अहमदनगर जिल्ह्यात राबवण्यात येणारा जलस्त्रोत विकास आणि शैक्षणिक सुविधा विकास प्रकल्प अशा विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP) या केंद्र शासनाच्या योजनेकरिता त्यांनी प्रशिक्षण व वाचन साहित्याचे लेखन केलेले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP), केंद्रीय पंचायतराज मंत्रालय आणि यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन’ या विषयावर नेमलेल्या तज्ञ समितीमध्ये, तसेच पर्यावरण संतुलित समृद्ध गाव (Eco Village) योजनेच्या मार्गदर्शीकेसाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या संपादक मंडळामध्येही त्यांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. सामाजिक आणि पर्यावरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांचे अनेक लेख विविध नियतकालिकांतून प्रकाशित झालेले आहेत.

सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सन 2015 मध्ये तत्कालीन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते त्यांना ‘पद्मासंघर्ष पुरस्कार’ प्राप्त झालेला आहे.

तसेच पर्यावरणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल सन 2016 मध्ये ‘पर्यावरण संवर्धन समिती’नेही त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.

‘वनराई’ ही पर्यावरण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील एक अग्रेसर संस्था म्हणून देशभर ओळखली जाते. वनराई संस्थेने महाराष्ट्र राज्यामध्ये आजवर सुमारे 250 पेक्षा जास्त गावांमध्ये समाजोपयोगी प्रकल्प राबवले आहेत.

सध्या सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, जालना, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. याशिवाय दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि गुजरात राज्यामध्येही विविध प्रकल्प राबवले आहेत.

दि. 1 जूनपासून त्यांनी सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे, अशी माहिती वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.