Amitabh Bachchan: ‘बिग बीं’च्या या चित्रपटाची कमाई ‘बाहुबली’पेक्षाही जास्त

Amitabh Bachchan super hit movie Amar Akbar Anthony record break income compare to Bahubali 2—The Conclusion

एमपीसी न्यूज- एकमेकांपासून हरवलेले तीन भाऊ, त्यांची प्रेमळ आई, त्या तीन भावांचे तीन धर्मांचे असणे, त्यांच्या तीन नखरेल प्रेमिका म्हणजे कोणता चित्रपट असू शकेल हे खऱ्या सिनेमाप्रेमींना सांगायलाच नको. आजच्याच दिवशी बरोबर ४३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘अमर अकबर अँथनी’ची ही भन्नाट स्टोरीलाईन त्यावेळी प्रचंड गाजली होती. तेव्हाचे यशस्वी आणि फॅमिली ड्रामा स्पेशल दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा हा मल्टीस्टारकास्ट पिक्चर तुफान चालला होता.

अनेकांना त्यांचे तरुणपणीचे दिवस या चित्रपटामुळे नक्की आठवले असतील. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर या त्रिमूर्तीने आपल्या वेगळ्या ढंगाच्या अभिनयामुळे हा चित्रपट यादगार बनवला होता.

या चित्रपटाला आज तब्बल ४३ वर्ष पूर्ण झाली आहेत. हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने बिग बींनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी या चित्रपटाची तुलना ‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाशी केली आहे.

‘४३ वर्षांपूर्वी ‘अमर अकबर अँथनी’ या चित्रपटाने सात कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. सध्याच्या महागाईचा विचार करता हा आकडा ‘बाहुबली २: द कन्क्लूज़न’ या चित्रपटाने केलेल्या कमाईपेक्षा मोठा आहे.’ अशा आशयाचे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.


नुकतेच या चित्रपटात अकबरची भूमिका करणारे अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. तीन वर्षांपूर्वी अमर साकारणारे विनोद खन्ना यांचे निधन झाले होते. या दोघांनाही कॅन्सर व्हावा हा दुर्दैवी योगायोग आहे.

यातील हिरॉइनपैकी परवीन बाबीचा मृत्यू झाल्याचे तीन दिवसांनंतर उघडकीस आले होते. मनमोहन देसाई यांनी देखील उतारवयात आत्महत्या केली होती.

तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘बाहुबली २: द कन्क्लूज़न’ हा भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने जवळपास एक हजार कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात प्रभास, राणा डग्गुबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या यांच्या भूमिका आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.