जगामध्ये प्रेम व शांतीचे स्वरुप एकसमान- अम्मा

 

राष्ट्रांच्या सीमांमध्ये प्रेम व शांतीला बाधित करण्याचे वा त्यांचे स्वरुप बदलण्याचे सामर्थ्य नसते. भारत व पाश्चात्य देशांतील संस्कृतीमध्ये खूप फरक आहे. परंतु प्रेम व शांतीचे स्वरुप मात्र सर्वत्र एकसमानच आहे. असे मत माता अमृतानंदमयी यांनी निगडी येथे प्रवचनात व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संत मानवतेच्या जपणुकीसाठी अविरत सेवा करणा-या माता अमृतानंदमयी देवी तथा अम्मा यांची भारत यात्रा सुरु आहे. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2019 रोजी दोन दिवसांच्या भेटीसाठी अम्मा पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये आल्या आहेत. आज, गुरुवारी (दि. २८) झालेल्या प्रवचनात त्या बोलत होत्या. दोन दिवस त्यांचे प्रवचन, भजन, ध्यान आणि दर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर राहुल जाधव, पदमभूषण विजय भटकर, ललिता भटकर, प्रा. विश्वनाथ कराड, सचिन चिखले आदी उपस्थित होते.
अम्मांच्या जगभरातील भक्तांच्या वतीने अम्मांची पाद्यपूजा केली. त्यानंतर अम्मांच्या ज्येष्ठ संन्यासी शिष्यांनी जगभरातील कोट्यवधी भक्तांच्या वतीने अम्मांना पुष्पहार घालून आपली श्रद्धासुमने अम्मांना अर्पण केली. त्यानंतर अम्मांचे हृदयस्पर्शी प्रवचन झाले.

अम्मा पुढे म्हणाल्या, “आपल्या संस्कृतीला सबळ वैज्ञानिक आधार आहे ही गोष्ट ,स्वीकार करण्यास येथील लोक तयार होत नाहीत. पण पाश्चात्य देशातील लोक समजून घेतल्यानंतर त्याचा स्वीकार करतात. परदेशात रस्ते, सार्वजनिक स्थळे व स्वच्छतागृहे कमालीचे स्वच्छ व नीटनेटकी असतात. याउलट भारतातील रस्ते व सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत गलिच्छ आहेत. रस्त्याच्या बाजूला लघवी करणे, रस्त्यावर व सार्वजनिक स्थळी थुंकणे ही भारतातील लोकांची एक सवयच बनली आहे. कचराकुंडी असली तरी लोकांना कचरा व उष्टे-खरकटे अन्न कचराकुंडीत टाकण्याची सवय नाही. लोक कचरा व अन्न असेच रस्त्याच्या बाजूला, अनेकदा रस्त्यातच टाकतात. परिसर शुद्धी व स्वच्छता हे विकासाचे, संस्कृतीचे व सभ्यपणाचे एक महत्वाचे अंग आहे.आज आपण दहशतवाद, धमक्या, अनैतिक नीतीमूल्ये यामुळे दिवसेंदिवस सामाजिक स्थिती उद्ध्वस्त होत चालली आहे. प्रत्येक जण भीती व दहशतवादाने ग्रासला आहे. अशा वेळी अध्यात्म हेच माणसाला मानसिक स्वास्थ्य मिळवून देते”

“जागतिकीकरणाच्या माध्यमातून जगभर संपर्क प्रस्थापित झाला असूनही जग अजूनही दुःख भोगतच आहे. आपले कुठे चुकले आहे ? बाह्य संपर्क साधनांनी अवघे जग एखाद्या लहान खेड्यासारखे जवळ आले आहे. तथापि त्याचवेळी आपण आंतरिक सद्वस्तूंचे ऐक्य साधण्यात- सर्व हृदये व मने परस्परांशी जोडण्याकडे पुरेसे लक्ष देण्यात अपयशी ठरलो आहोत” असे त्या म्हणाल्या.

भारत अण्वस्त्र संपन्न राष्ट्र आहे. भारत विज्ञान, तंत्रज्ञान व आर्थिक क्षेत्रात प्रगती करत आहे. प्रसिद्ध झालेले अनेक अहवाल सांगत आहेत की 2025 साली भारत जगातील तिसरी महासत्ता म्हणून उदयास येईल. असे असले तरी पर्यावरण स्वच्छता, आपल्या राहत्या परिसराची साफ-सफाई याबाबतीत मात्र आपण अजूनही खूप मागे आहोत.

निगडी, यमुनानगर येथील माता अमृतानंदमयी मठात दोन दिवसीय कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार (दि. 1 मार्च) रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. प्रवचन, भजन, ध्यान तसेच दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान अम्मा प्रत्येक भक्ताला वैयक्तिक दर्शन देणार आहेत. अम्मांच्या दर्शनासाठीचे टोकन्स कार्यक्रमस्थळी विनामूल्य उपलब्ध होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.