Pimpri news: अजित गव्हाणे हे राजकारणापलीकडे समाजाचे हित जपणारे नगरसेवक – खासदार डॉ. अमोल कोल्हे

अजित गव्हाणे यांच्या माध्यमातून डॉ. कोल्हे यांच्या हस्ते 1700 नागरिकांना हेल्थ कार्डचे वाटप

एमपीसी न्यूज:  नगरसेवक अजित गव्हाणे यांनी भोसरीतील 1700 नागरिकांचे आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढले. ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. 937 सुविधा असलेले आणि दीड हजाराच्यावर वैद्यकीय प्रक्रियांचे हे विमाकवच आहे. खासगी किंवा शासकीय रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकणार आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचे हित डोळ्यासमोर ठेऊन अजितभाऊ काम करतात. त्यांचे मी मनापासून कौतुक करतो, असे गौरोद्वगार राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या पुढाकारातून भोसरीतील 1700 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे खासदार डॉ. कोल्हे यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) वितरण करण्यात आले. 937 आरोग्य सुविधा आणि 1862 हून अधिक वैद्यकीय प्रक्रियांचे विमाकवच असलेले प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ओळखपत्र देण्यात आले. भोसरी, दिघीरोड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोरील झालेल्या कार्यक्रमाला नगरसेविका अनुराधा गोफणे, प्रियंका बारसे, नगरसेवक विक्रांत लांडे, संजय वाबळे, श्याम लांडे, पंकज भालेकर, भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष अमित लांडगे, उद्योजक भरतआबा लांडगे, उद्योजक संजय उदावंत, ओबीसीचे सेलचे अध्यक्ष विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी, ओबीसीचे सेलचे प्रदेश निरीक्षक सचिन औटी, माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, उद्योजक अमर फुगे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी स्वच्छतेबाबत नागरिकांना शपथ देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, कोणी रस्त्याची, कोणी सभा मंडपाची मागणी करतो. या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण, काहीतरी शास्वत गोष्ट घडली पाहिजे. ज्याचा रोजच्या आयुष्याशी संबंध असतो. कोरोनाने आपले खूप नुकसान केले. जीवलग गमावले. समाज म्हणून याकडे पाहत असताना आरोग्याच्या विषयी जाणीव, आपले डोळे उघडण्याचे काम कोरोनाने केले म्हटले तर वावगे ठरणार नाही. आरोग्याकडे आपण आत्तापर्यंत फार दुर्लक्ष केले होते. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, विमा या सगळ्या गोष्टीची फार प्रकर्षाने जाणीव झाली.

समाजकारणात, राजकारणात येत असताना अजितभाऊसारखे तरुण, युवा नेतृत्व ज्या पद्धतीने हिरिरीने काम करत आहेत. ते केवळ राजकारण करत नाहीत. राजकारणाकडे समाजकारणाच्या दृष्टीने पाहत आहेत ही कौतुकाची, अभिमानाची आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. असा उपक्रम राबविला. त्यामुळे अजितभाऊंचे मी मनापासून अभिनंदन करतो. शिरुर लोकसभा मतदारसंघात स्व:खर्चाने 5 लाख नागरिकांचे लसीकरण केले. कोरोनाच्या दोन लाटांच्या तडाखा बसला आहे. तिस-या लाटेचा धोका आहे. कोरोनाचा नवीन विषाणू येत आहे. त्यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे. लस घ्या, नियमांचे पालन करावे, असे आवाहनही खासदार डॉ. कोल्हे यांनी केले

ज्येष्ठ नागरिकांसाठी अखंड व अविरत जनसेवेची ग्वाही -अजित गव्हाणे

नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, ”आपण सर्वजण मागील पावणे दोन वर्षांपासून कोरोना महामारीचा सामना करत आहोत. असे संकट आपल्यावर येईल असा कोणीही विचार केला नव्हता. या संकटात अनेक जीवाभावाची लोक सोडून गेली. त्यासाठी वैद्यकीय सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे. कोरोनाच्या संकटात लोकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला. वायसीएम, भोसरी, थेरगाव, आकुर्डी रुग्णालये कोरोना काळात वरदान ठरली. भोसरी रुग्णालयाचा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा उपयोग झाला. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून भोसरी रुग्णालयात 24 आयसीयूचे बेड उपलब्ध करुन दिले. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळाली. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली. खासदार कोल्हे यांनी जगदंबा प्रतिष्ठानमार्फत लस उपलब्ध करुन दिली.

कोरोनाचा नवीन विषाणू येत आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज रहायचे आहे. या हेल्थकार्डमध्ये पाच लाख रुपयांचा विमा आहे. 2011 च्या जनगणनेप्रमाणे कार्डचे वाटप केले आहे. अनेक लोकांना हेल्थकार्ड मिळावेत. तशी विनंती खासदारांकडे केली आहे. भविष्यात वैद्यकीय सुविधेवर भर देणे गरजेचे आहे. वैद्यकीय सुविधा मोफत देण्याचे नियोजन केले आहे. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी केली. तर, भविष्यकाळात सर्वच नागरिकांना वैद्यकीय विम्याची सुविधा मिळू शकेल. खासदारांच्या माध्यमातून भोसरी परिसरात विविध विकास कामे होत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी अखंड व अविरत जनसेवेची ग्वाही गव्हाणे यांनी दिली.

छाया बोरसे यांनी जनआरोग्य योजनेची माहिती दिली. या योजनेअंतर्गत कॅशलेस आरोग्य सुविधा मिळणार आहे. खासगी किंवा शासकीय रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकणार आहेत. प्रत्येक कार्ड धारकांना 937 आरोग्य सुविधा मिळणार आहेत. गरोधरपणात घ्यावयाची काळजी, माता आरोग्य सेवा, मानसिक उपचार, दंतचिकित्सा, कानाचा विचार, त्वचारोग, आपत्कालीन रोग आणि हृद्याशी निगडीत अशा विविध शस्त्रक्रिया होणार आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक साकोरे यांनी केले. तर, विजय लोखंडे यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.