Maharashtra News : आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहांसह अम्युझमेंट पार्क सुरु

एमपीसी न्यूज : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगानं सुरु आहे. त्याचबरोबर कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. कोरोना रुग्णसंख्याही आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं राज्य अनलॉक होत आहे. त्यातच आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणार आहेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.

सुरुवातीला राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. तशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती.  

यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगल्यावर थिएटर मालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं होतं. या बैठकीत सिनेमागृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे, मात्र 50 टक्के क्षमतेची अट शिथिल करावी याबाबत चर्चा झाली.

आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी, प्रेक्षक अशा सर्वांनाच या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

या बैठकीला टास्कफोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.