Pune : कोरोनाच्या काळात खर्च केलेला एक एक रुपयाचा हिशोब पुणेकरांसमोर जाहीर करावा

An account of the money spent during the corona period should be submitted to the citizens of pune

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात खर्च केलेला एक एक रुपयाचा हिशोब पुणेकरांसमोर जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

पुणे महापालिकेकडून कोरोना काळात महाराष्ट्र अधिनियम 67 (3) (क) अन्वये तातडीने खरेदी कार्यवाही चालू असून, त्याचा विनियोग चुकीच्या पद्धतीने होऊ नये. यासाठी पुढील काळात निविदा प्रक्रिया राबवून कामे करण्यात यावी, यापुढे धोरणात्मक निर्णय सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करूनच करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे उत्पन्न घेतले असले तरीही राज्य शासनाकडून 312 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. पुणे शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असून, पालकमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कौन्सिल हॉल येथे बैठका घेऊन आढावा घेत आहेत. राज्य शासनाकडून महापालिकेला देण्यात येणारे अनुदान हे वेळेत मिळाल्याने कोरोनाच्या काळात दिलासादायक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करणे, कोविड सेंटर उभारणी, उपचाराचा खर्च, क्वारांटाईन कक्ष यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.

या काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने बांधकाम, आकाशचिन्ह विभाग, मिळकत कर यांचे उत्पन्न घटले आहे. दुसरीकडे राज्य शासनाचेही उत्पन्न घटले असताना अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने शासनाकडून वेळीच अनुदान पाठविण्यासाठी पुणे महापालिकेला मदत केली आहे.

राज्य शासनाकडून आणखी काही रक्कम येणे बाकी आहे. याबाबत आम्ही अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी दिली. पुणे महापालिकेतर्फे राज्य शासनाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून आर्थिक मदत मिळण्यासाठी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.