Dighi : पाईप लाईनमधूनच तेल चोरी करण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – दुकानातून, दुकानाबाहेरून, एखाद्याच्या हातातून किंवा घरातून तेल चोरीच्या घटना आजवर घडल्या आहेत. पण चक्क तेलाच्या पाईप लाईनमधूनच तेल चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे आजवर तरी कधी ऐकिवात नाही. असाच एक अजब प्रकार दिघी येथे घडला आहे. परंतु तेल कंपनीच्या अलार्मने सुरक्षा रक्षकांना वेळेवर जागे केले अन तेलाच्या पाईप लाईनला भगदाड पाडून तेल चोरण्याचा तेल चोरांचा प्रयत्न फसला. ही घटना शुक्रवारी (दि. 3) पहाटे घडली.

एचपीसीएल कंपनीचे अधिकारी ब्रिजेश गिरीराज मीना यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरटयांविरोधात चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथून एचपीसीएल या कंपनीची तेलाची पाईप लाईन गेली आहे. ही पाईप लाईन फोडण्याच्या उद्देशाने पाईप लाईनच्या वरच्या भागावर अज्ञात चोरट्यांनी जमीन खोदली. परंतु पाईप लाईन पासून सात फुटांच्या अंतरावर काही खोदकाम झाले तर कंपनीच्या कार्यालयात धोक्याचे अलार्म वाजतात. अशाच प्रकारचे अलार्म शनिवारी पहाटे दिघी येथील कार्यालयात वाजले. कंपनीचे सुरक्षारक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अज्ञात लोकांनी जमीन खोदली होती. यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गिरी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.