Pune : कंपनी व्यवस्थापनाच्या त्रासाला कंटाळून कर्मचारी महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – शुल्लक कारणावरून कर्मचारी महिलेला कारणे दाखवा नोटीस देत, कंपनीने तुम्हाला कामावरून का काढू नये, असे बोल सुनावले. यावरून कर्मचारी महिलेने डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार आज (सोमवारी) दुपारी एकच्या सुमारास पिरंगुट येथील ब्रिंटन कार्पेट एशिया प्रा. लि. या कंपनीत घडला.

वैशाली काळभोर असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. वैशाली कंपनीतील पिकिंग विभागात टेक्निशियन म्हणून मागील काही वर्षांपासून काम करतात. 22 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास वैशाली चेंजिंग रूममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची एक मैत्रीण महिला कर्मचारी जेवण करीत होती. वैशाली यांना पाहून त्यांच्या मैत्रिणीने जेवणाचा आग्रह केला. त्यामुळे दोन घास खाण्यासाठी त्या थांबल्या होत्या. त्यांच्या पायाला इजा झाली असल्याने त्या अपंग आहेत. त्यामुळे त्या व्यवस्थित बसू शकत नाहीत. म्हणून त्या पाय पसरून बसल्या होत्या.

वैशाली पाय पसरून बसल्याचे त्यांच्या आणखी एका कर्मचारी महिलेने पाहिले. हा प्रकार त्या महिलेने लगोलग कंपनी व्यवस्थापनाच्या कानावर घातला. मागील काही दिवसांपासून कंपनी प्रशासन कामगारांवर खार खाऊन होते. वैशाली यांच्या माध्यमातून कामगारांना धडा शिकवण्याची संधी शोधात कंपनी प्रशासनाने वैशाली यांना कारणे द्या, नोटीस बजावली. तसेच त्यामध्ये कंपनीने तुम्हाला कंपनीतून का काढू नये, असे विचारण्यात आले. असे असले तरी व्यवस्थापनाने वैशाली यांना बोलण्याची संधी दिली नाही. यामुळे वैशाली मानसिक तणावात होत्या. त्याच तणावातून त्यांनी आज डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे समजत आहे. यापूर्वी एप्रिल 2018 मध्ये कंपनीमधील अविनाश कुमार धिमाण यांनी व्यवस्थापनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर पाच महिन्यांच्या कालावधीनंतर हा प्रकार घडल्याने कंपनी व्यवस्थापनावर कामगार वर्ग नाराज झाला आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कंपनीकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.