Pune News : पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने चोरले तब्बल २ लाखांचे मोबाईल

एमपीसी न्यूज : पालिकेच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी हा सराईत मोबाइल चोरटा असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने हा मार्ग पत्करला होता. बिबवेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन 1 लाख 88 हजारांचे 21 मोबाइल जप्त केले आहेत. तानाजी रणदिवे (वय 33, रा. शांतीनगर, रामटेकडी) असे चोरट्याचे नाव आहे.

वाढत्या मोबाइल चोरीच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर बिबवेवाडी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गंगाधाम रोडवर चोरीचे मोबाइल विकण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार सतीश मोरे यांना मिळाली. त्यावेळी नागरिकांना मोबाइल विकत घेण्याबाबत विचारणा करणाऱ्या तानाजी रणदिवे याला पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे 6 मोबाइल आढळले. चौकशीत त्याने पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचे सांगितले.

कर्ज फेडण्यासाठी बिबवेवाडी, मार्केटयार्ड परिसरातून मोबाइलची चोरत असल्याची कबुली दिली. तब्बल 50 हून अधिक मोबाइल चोरून अनोळखी व्यक्तींना विकल्याचे त्याने सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, राहुल शेलार यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.