Chinchwad News : दर पाच दिवसाला घडतेय पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याची एक घटना

पोलिसांनाच होतेय धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण; मग सर्वसामान्य नागरिकांची अवस्था काय

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांवर होणारे हल्ले तसेच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मागील 50 दिवसात पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा 11 घटना घडल्या आहेत. हे प्रमाण पाच दिवसांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे शहरात पोलिसांनाच धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनुचित प्रकार घडल्यास, मारहाण, भांडण तंटा झाल्यास लगेच पोलिसांना बोलावले जाते. पोलीस देखील मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकदा वाद मिटवणे पोलिसांच्याच अंगावर येते. वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याच्या 50 दिवसात पाच घटना घडल्या आहेत. त्यातील काही घटनांमध्ये मारहाण तसेच थेट गडचिरोलीला बदली करण्याची देखील धमकी देण्यात आली आहे. नागरिक पोलिसांना थेट वर्दी उतरवण्याची, बदलीची, बघून घेण्याची भाषा वापरत असल्याने पोलिसांचा धाक शहरात कमी झाला आहे का, अशीही चर्चा सध्या शहरात सुरु आहे. तसेच पोलिसांना बघून घेण्याची धमकी देण्याचे बळ नागरिकांच्या अंगी येते कुठून, हा संशोधनाचा विषय आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणा-या पोलिसांशी देखील नागरिक हुज्जत घालतात. मोशी येथे सिग्नल तोडणा-या रिक्षा चालकाला अडवले म्हणून रिक्षा चालकाने थेट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केली. तर दापोडी येथे ट्रिपल सीट जाणा-या एका दुचाकीस्वाराला पावती करण्यास सांगितल्यावरून वाहतूक पोलीस महिलेला अश्लील शब्दात बोलून तिचा विनयभंग करण्यात आला. चाकण येथे भर दिवसा चौकात दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. कंटेनर मागे घेण्याच्या शुल्लक कारणावरून हा प्रकार घडला.

तडीपार आरोपी शहरात फिरतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हे आरोपी राजरोसपणे धमकावतात. तसेच पिस्तुलाच्या धाकाने लोकवस्तीत दहशत निर्माण करणा-याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गचांडी पकडून बघून घेण्याची धमकी देतात. पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक कमी झाल्याने असे प्रकार घडत आहेत.

पोलीस आणि नागरिकांसाठी देखील रोल मॉडेल म्हणून ओळखले जाणारे आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी गुन्हेगारांना सज्जड दम दिला. अवैध धंदे वाल्यांना देखील खडसावले. शहरातून अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी खास सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाकडून आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मात्र अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यात रमलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांचे शहरात पोलिसांचा धाक कायम ठेवण्याकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, याची शाहनिशा एकदा पोलिसांनीच करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एक जानेवारी 2021 पासून शहरात घडलेल्या घटना –

#  1 जानेवारी –  भोसरी पोलीस ठाणे

घरावर दगडफेक करणा-यास रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच ‘माझ्या खूप ओळखी आहेत. तुझी एका दिवसात वर्दी उतरवेल. गडचिरोलीला बदली करेल’.  तुला माहीती आहे का, मी कोण आहे? तु जरा शिस्तीत रहा. तुला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करून टाकील. अशी धमकी पोलीस कर्मचा-याला दिली. ही घटना 1 जानेवारी रात्री साडेदहा वाजता दिघी रोड, भोसरी येथे घडली. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

# 6 जानेवारी – पिंपरी पोलीस ठाणे

नियंत्रण कक्षातून आलेल्या कॉलनुसार पिंपरी पोलीस घटनास्थळी गेले असता तिथे एका व्यक्तीचे वाहन चोरी केल्याचे सांगण्यात आले. पोलीस संबंधित वाहन चोराला पकडत असताना दोन महिलांनी पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. ही घटना 6 जानेवारी रोजी रात्री नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 9 जानेवारी – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे

रिक्षा चालकाने सिग्नल तोडला. त्यामुळे त्याला वाहतूक पोलिसांनी अडविले. त्यावेळी रिक्षा चालकाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केली. तसेच पोलीस नाईक आणि ट्राफिक वॉर्डनशी हुज्जत घालून शिवीगाळ करत पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. ही घटना 9 जानेवारी रोजी देहूफाटा, मोशी येथे घडली. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 11 जानेवारी – वाकड पोलीस ठाणे

वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने एका दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यावरून दुचाकीस्वाराने कारवाई करणा-या पोलीस उपनिरीक्षकाची व्हिडीओ शूटिंग काढली. तसेच त्यांच्यासोबत झटापट करून ढकलून दिले. पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली. ही घटना 11 जानेवारी रोजी रहाटणी फाटा, काळेवाडी य़ेथे घडली.

# 23 जानेवारी – चाकण पोलीस ठाणे

दोन गटात सुरु असलेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याची घटना 23 जानेवारी रोजी रात्री माणिक चौक चाकण येथे घडली. त्यात एका पोलिसाच्या हाताला दुखापत झाली. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 30 जानेवारी – चाकण पोलीस ठाणे

कंटेनर मागे घेण्यावरून झालेल्या वादातून दोघांनी मिळून एका वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यात वाहतूक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. ही घटना 30 जानेवारी रोजी चाकण चौकात भर दिवसा घडली. मारहाण करणारे दोघेजण कल्याणला पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

# 1 फेब्रुवारी – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे

तडीपार आरोपी त्याच्या तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहरात आढळून आला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी भारत माता चौक, मोशी येथे घडली. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

# 14 फेब्रुवारी – आळंदी पोलीस ठाणे

मैत्रिणीला तिच्या कामाच्या ठिकाणी भेटण्यासाठी गेलेल्या तरुणीसोबत एका तरुणाने अश्लील चाळे केले. त्यानंतर अन्य तीनजण आले. त्यांनी देखील तरुणीसोबत गैरवर्तन करत तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने तिच्या मौत्रिणीच्या मदतीने पोलिसांना बोलावले असता आरोपींनी पोलिसांना मारहाण केली. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी दुपारी आळंदी मधील चाकण चौकात घडली. आळंदी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे.

# 15 फेब्रुवारी – तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे

ऑन ड्युटी पोलीस कर्मचा-याच्या वर्दीची कॉलर पकडून पोलीस करत असलेल्या सरकारी कामात दोघांनी अडथळा निर्माण केला. तसेच पोलिसाला बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी रात्री सोमाटणे येथे एका ढाब्यावर घडली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे.

# 19 फेब्रुवारी – चाकण पोलीस ठाणे

लोकवस्तीत पिस्तूलाच्या धाकाने दहशत निर्माण करून दुकाने बंद करण्यास तसेच नागरिकांचे दैनंदिन व्यवहार करण्यास मनाई केली. याबाबत कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता पोलिसांची गचांडी पकडून पोलिसांना पाहून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार 19 फेब्रुवारी रोजी रात्री खंडोबामाळ, चाकण येथे घडला. पोलिसांनी दहशत निर्माण करणा-या आरोपीला अटक केली आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

# 20 फेब्रुवारी – भोसरी पोलीस ठाणे

ट्रिपलसीट जाणा-या एका दुचाकीस्वाराला वाहतूक पोलीस महिलेने दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस महिलेला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी फुगेवाडी चौक, दापोडी येथे घडला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.