Pune News : नोकरी दूत! गरजूंना नोकरी मिळवून देण्यासाठी दोन तरुणांचा पुढाकार

पुण्यातील मनीष ठोकरे आणि मनोज कदम या दोन तरुणांनी कोणताही मोबदला न घेता मदत मागणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळवून देण्याचा जणू ध्यासच घेतला आहे. कोरोना काळात त्यांनी 321 जणांना नोकरी मिळवून दिली आहे. आतापर्यंत 25 हजारांहून अधिक तरुणांना त्यांनी नोकरीविषयक विनामूल्य मार्गदर्शनही केले आहे.

एमपीसी न्यूज – नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या फ्रेशर आणि अनुभवी उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी दोन तरुण आपली नोकरी सांभाळून प्रयत्न करत आहेत. नोकरीसाठी शिक्षणाबरोबरच कौशल्य आणि योग्य मार्गदर्शन याची गरज असते पण ते मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागतात हे तरूण मात्र ते काम मोफत पुरवतात. गरीब तसेच ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व इच्छित नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. कोणाचीही फसवणूक न करता मदत मागणा-या प्रत्येकाला नोकरी मिळवून देण्याचा ध्यास त्यांनी केला आहे. 

मनीष ठोकरे आणि मनोज कदम असे या दोन तरुणांचे नाव आहे. दोघेही स्वत:ची नोकरी सांभाळून नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या गरजूंना विना मोबदला मदत करतात.

कोरोना या अभूतपूर्व संकटामुळे सर्वच क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचारी कपात, वेतन कपात यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकाळात बरेच तरुण बेरोजगार झाले आहेत.

काही फ्रेशर विद्यार्थ्यांना होणाऱ्या कर्मचारी भरतीबद्दल माहिती मिळत नाही त्यामुळे ते संधी गमावून बसतात, तसेच मिळालीच माहिती तर कसा आणि कुठे अर्ज करायचा, मुलाखत कशी द्यायची, रिज्युम कसा बनवायचा याबाबत माहिती नसते त्यामुळे विविध अडचणी निर्माण होतात. या सर्वांना मनीष ठोकरे आणि मनोज कदम मदतीचा हात देत आहेत.

नोकरीच्या शोधात असलेल्यांना सोशल मीडिया जसं फेसबुक, व्हाट्सअप, लिंकड्इन वरून विविध कंपनीतील रिक्त पदे यांच्या बाबत माहिती दिली जाते. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने दर आठवड्याला मार्गदर्शन केले जाते.

नोकरीची माहिती देणारी विविध संकेतस्थळं उपलब्ध आहेत त्यावर आपलं प्रोफाईल कसं बनवायचं याबाबत माहिती दिली जाते.तसेच, इतर ठिकाणी काम कसे शोधायचे, रिज्युम कसा तयार करावा, मेल कसा लिहावा, मुलाखतीची तयारी त्यात विचारले जाणारे विविध प्रश्न, आत्मविश्वास वाढवणे याबाबत तयारी करून घेतली जाते.

एकएकाच्या मुलाखती घेऊन त्यांना सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते. या उमेदवारांना मुलाखतीसाठी संलग्न असलेल्या विविध कंपन्यांमध्ये पाठवले जाते.  एखाद्या उमेदवारांची काही कारणास्तव निवड झाली नाही तर ज्या ठिकाणी तो कमी पडला यावर लक्ष केंद्रित करून त्याला प्रशिक्षण दिले जाते.

मनीष ठोकरे आणि मनोज कदम यांनी 2016 पासून या कामाला सुरवात केली असून आज जवळपास 25 हजारांहून अधिक अनुभवी ते फ्रेशर मुलं – मुली त्यांच्याशी जोडली गेली आहेत. विशेष म्हणजे आजवर त्यांनी कुणाकडूनही पैसे घेतले नाहीत.

कोरोनाच्या काळात त्यांनी 321 पेक्षा अधिक उमेदवारांना नोकरी मिळवून दिली आहे. गरजूंना नोकरी मिळवून देण्याचा आमचा ध्यास असल्याचे ते दोघेही सांगतात आणि विश्वासार्हता यामुळे खूप लोक आमच्याशी जोडले गेल्याचेही ते सांगतात.

‘नोकरी मिळाल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद विलक्षण समाधान देणारा’

ग्रामीण भागातून येणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना शहरात येऊन नोकरी कशी मिळवावी याबाबत फारशी माहिती नसते. रिज्युम कसा असावा, मुलाखत कशी द्यायची, आत्मविश्वास कसा वाढवायचा याबाबत अपुरी माहिती असते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांना नोकरी मिळत नाही. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अंगी असलेल्या कौशल्यांचा वापर करणे आवश्यक असते. आम्ही आमच्या माध्यमातून ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या नोकरी व्यतिरिक्त या गोष्टींची देखील माहिती पुरवतो. यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे अथवा फी घेतली जात नाही. नोकरी मिळवल्यानंतर लोकांना जो आनंद मिळतो त्यातच खरं आमचे समाधान आहे. जास्तीत जास्त उमेदवारांना यांचा फायदा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. असं मत मनीष ठोकरे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना व्यक्त केले.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनुभवी अथवा फ्रेशर उमेदवारांनी आम्हाला संपर्क साधावा, असे आवाहनही मनीष ठोकरे यांनी केले आहे.

मनीष ठोकरे – 7276727620 / मनोज कदम – 7709417395

फोन करून अथवा व्हाट्सअपच्या माध्यमातून त्यांना संपर्क साधता येईल.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.