Pimpri: दिलासादायक! आनंदनगरमधील रुग्ण कोरोनामुक्त होण्यास सुरुवात; रुग्ण वाढीचा दरही झाला कमी

Anandnagar corona patients started getting cured; decrease in the rate of patient count.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरलेल्या आणि रुग्णांचा आकडा दोनशेच्या जवळ गेलेल्या चिंचवड आनंदनगर झोपडपट्टीतील रूग्ण कोरोनामुक्त होण्यास सुरुवात झाली आहे. आज (बुधवारी) आनंदनगरसह विविध भागातील 21 रुग्ण एकाचदिवशी कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच दिवसभरात 22 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. मागील चार दिवसांच्या तुलनेत आजची रुग्णवाढ कमी असून ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे.  या झोपडपट्टीत 13 मे रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झाला.

झोपडपट्टीत दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. अवघ्या 14 दिवसात झोपडपट्टीतील रुग्णसंख्या दोनशेपर्यंत जावून पोहचली होती. त्यामुळे संपूूर्ण शहराचे आनंदनगरकडे लक्ष लागले होते.

आता झोपडपट्टीतील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यास सुरुवात झाली आहे. आज आनंदनगरमधील काही रुग्ण बरे झाले आहेत. आनंदनगरसह किवळे, संभाजीनगर, रुपीनगर, रहाटणी, चिखली, बोपोडी, कसबा पेठ अशा ठिकाणी एकाचदिवशी 21 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दुसरी दिलासादायक बाब म्हणजे शहराला रेडझोनमधून वगळल्यापासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत होती. मागील चार दिवसामध्ये दिवसाला 40 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत होती.

आज नवीन 22 रुग्णांची वाढ झाली आहे. मागील चार दिवसांच्या तुलनेत आजची रुग्ण संख्येची वाढ कमी आहे.

त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.