Chikhali : …अन् स्मृतीभ्रंश झालेले 85 वर्षीय आजोबांना सात तासांनी सापडलं लेकीचं घर!

माणुसकीला साथ मिळाली सोशल मीडियाच्या 'जादू'ची

एमपीसी न्यूज – माणुसकीचं नातं जिवंत ठेवणा-या काही चांगल्या माणसांमुळे अंशतः स्मृतीभ्रंश होऊन हरवलेल्या 85 वर्षाच्या आजोबांना त्यांचे कुटुंब सापडले. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी घडवून आणता येतात, याचा प्रत्ययही या घटनेतून आला. चिखली येथील रवि जांभूळकर आणि त्यांच्या मित्रांमुळे या आजोबांना सात तासानंतर आपल्या लेकीचे घर पुन्हा सापडले.

बाबूराव गबाजी जाधव हे अहमदनगरचे रहिवासी. ते रविवारी चिखली येथील राजे शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आपल्या लेकीला आणि जावयाला भेटण्यासाठी आले होते. सोमवारी सकाळी नाश्ता करून ते फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांची लेक आणि जावई शिवाजी घोडके दोघेही त्यांच्या कामावर निघून गेले होते. आणि घरी फक्त मुले होती.

मात्र, 15 मिनिटांच्या फेरफटक्यानंतर ते राजे शिवाजीनगरच्या गणपती मंदिराजवळ आले असता त्यांना स्मृतीभ्रंश झाला. आणि त्यांना काहीही आठवेनासे झाले. ते अगदी गोंधळून गेले. त्यांना रडू कोसळले. त्यामुळे तेथील लोकांचा त्यांच्या भोवताली जमाव जमला, मात्र या आजोबांना काहीही आठवत नसल्याने नागरिकांना काहीही सुचत नव्हते. तेथील रवी महाडणे यांनी तेथील एक स्थानिक व्यावसायिक रवि जांभूळकर यांना बोलवून त्याला याची माहिती दिली.

त्यानंतर जांभूळकर यांनी या आजोबांना त्यांचे कुटुंब परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी आजोबांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी ते काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. ते फक्त मला माझ्या घरी जायचंय एवढंच बोलत होते. जांभूळकर यांनी हळूहळू त्यांचा विश्वास मिळवत त्यांना आपल्या कारमध्ये बसवले व संपूर्ण परिसरात फिरवले. जांभूळकर यांनी त्यांना काही तरी खाण्या-पिण्यासाठी खूप वेळा विनवले, मात्र ते काहीही घ्यायला तयार नव्हते.

जवळपास चार तास कारमधून संपूर्ण परिसरात फिरल्यानंतरही त्यांना आजोबांचे घर सापडले नाही. या चार तासात या आजोबांनी एकच वाक्य उच्चारले, जावई शिवाजी घोडके! आणि त्यांच्या खिशात त्यांचे आधारकार्ड असल्याने त्यांचे नाव बाबूराव जाधव आहे हे समजले.

एवढ्या माहितीच्या आधारे जांभूळकरांनी त्यांचा फोटो काढून व्हॉट्स अप वर आणि फेसबुकवर पोस्ट केला. राजे शिवाजीनगरमध्ये कोणी शिवाजी घोडके राहतात का किंवा कोणी त्यांना ओळखतात का, त्यांचे सासरे बाबूराव जाधव हे हरवले असून त्यांना स्मृतीभ्रंश झाल्याने घर सापडत नाहीे. कोणाला काही माहिती असेल तर त्यांनी त्वरित संपर्क साधावा, अशी पोस्ट टाकली. पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे मित्र महाडणे आणि योगेश कपिले यांचे नंबर दिले. कारण ते स्वतः गाडी चालवत होते.

यामधल्या काळात ही पोस्ट अनेकांनी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केली. ग्रुपवर मेसेज व्हायरल झाल्याने लवकरच घोडके यांची माहिती मिळाली. जांभूळकर यांना त्यांच्या एका सहकाऱ्याने माहिती दिली. घोडके यांनी त्यांच्या सास-यांना ओळखले आहे. योगायोगाने योगेश कपिले यांच्याकडे घोडके यांचा मोबाईल नंबरही सापडला. त्यांनी त्यांचा संवाद जांभूळकर यांच्याशी घडवून आणला. आणि सकाळी पावणेनऊ वाजता घरातून बाहेर पडलेले आजोबा सात तासांनी म्हणजे दुपारी साडेतीन वाजता घरी परतले. यावेळी त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते.

यावेळी त्यांची मुलगी शांता घोडके यांनी त्यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे मात्र, अशी घटना पहिल्यांदाच घडली, असे त्यांनी सांगितले. तर या आजोबांना त्यांचे कुटुंब मिळाल्याने मी खूप आनंदी आहे, तसेच सोशल मीडियात किती ताकद आहे हे देखील पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असे जांभूळकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.