MPC News Impact :… आणि हरवलेले आजोबा सुखरुप पोहोचले आपल्या घरी 

एमपीसी न्यूज – स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त असलेले एक आजोबा आपल्या राहत्या घरातून बाहेर पडले. भटकत भटकत ते मुंबई – पुणे महामार्गावर फिरताना कामशेत येथील किनारा वृद्धाश्रमच्या कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांच्या पायाला इजा झाली होती तसेच, घर आणि आप्तेष्ट यांच्याबद्दल त्यांना जास्त माहिती आठवत नव्हती. किनारा वृद्धाश्रमच्या संचालिका प्रिती वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एमपीसी न्यूज’ने याबाबत बातमी करत आजोबांच्या नातेवाईकांना त्यांना घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. अखेर या आजोबांचा मुलगा व मुलीने वृद्धाश्रमला भेट देऊन आपल्या वडिलांना परत घरी नेले आहे. 

किनारा वृद्धाश्रमाच्या वतीने शुक्रवारी (दि. 26, फेब्रुवारी) निराधार शोध मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत हातात रिकामी बाटली घेऊन मुंबई – पुणे महामार्गावर लोणावळा जवळ एक आजोबा पाणी मागताना रात्री दहाच्या सुमारास आढळले. त्यांनी आपले नाव रामचंद्र केसरकर असून, आपण महाडचे रहिवासी असल्याचे सांगितले. त्यांना तीन अपत्ये देखील आहेत. याव्यतिरिक्त त्यांना इतर काहीच आठवत नव्हते.
आजोबांच्या पायाला इजा झाली असल्याने त्यांना मदतीची गरज होती. किनारा वृद्धाश्रमाच्या वतीने त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केलं. दवाखान्यात त्यांच्या पायाला 10 टाके असून ते अद्याप काढले नाहीत असं समजले. औषधोपचार केल्यानंतर आजोबांना वृद्धाश्रमात हलवण्यात आले. वृद्धाश्रमात त्यांची देखभाल करण्यात आली.
‘एमपीसी न्यूज’ने याबाबत बातमी करत आजोबांच्या नातेवाईकांनी किनारा वृद्धाश्रमाला संपर्क साधावा असे आवाहन केले होते.

आजोबांचा मुलगा अरविंद केसरकर मुंबईत नोकरी करतात. त्यांना गावातील व्हाट्सअप गृपवर आपल्या वडिलांची बातमी मिळाली. अरविंद आणि त्यांची बहीण वनिता खैरे यांनी तात्काळ किनारा वृद्धाश्रम येथे धाव घेतली व गुरुवारी (दि. 4, फेब्रुवारी) आपल्या वडिलांना परत घरी नेले. यावेळी मुलगा अरविंद केसरकर व मुलगी वनिता खैरे यांना अश्रू अनावर झाले. आपले वडील याठिकाणी कसे पोहचले याबाबत आपल्या कही माहिती नसल्याचे ते म्हणाले. किनारा वृद्धाश्रमने आपल्या वडिलांची चांगली काळजी घेतली व त्यांना सुखरुप सूपूर्द केलं याबद्दल त्यांनी वृद्धाश्रमचे आभार मानले.
किनारा वृद्धाश्रमच्या संचालिका प्रिती वैद्य म्हणाल्या, आजोबांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचवू शकलो हे फार महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे. आपले वडिल वृद्धाश्रमात सुखरूप आहेत हे बघून दोघांनाही गहिवरून आले होते. वृद्धाश्रमाचे त्यांनी आभार मानले. आजोबांची काळजी घेतल्याबद्दल मुलानी वृद्धाश्रमाला दान केल्याचे देखील वैद्य यांनी सांगितले.
* एमपीसी न्यूज’ची मूळ बातमी 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.