Pune : मुलांना जबर मारहाण केल्याप्रकरणी वडिलांची पोलीस कोठडीत रवानगी

एमपीसी न्यूज – लहान भावासोबत खेळत असताना तो खाली पडल्याने चिडलेल्या वडिलांनी दोन्ही मोठ्या भावांना जबर मारहाण केली. याप्रकरणी एका समाजसेवकाने विमानतळ पोलीस ठाण्यात बाल हक्क संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार वडिलांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वडील यांना तीन लहान मुले आहेत. एक 11 वर्षाचा, दुसरा 9 वर्षाचा आणि तिसरा आणखी लहान आहे. हे दोन्ही मोठी भावंडे या तान्हुल्याला घेऊन खेळत होते. मात्र, तो पलंगावरून खाली पडला. याचा राग येऊन चिडलेल्या वडिलांनी दोन्ही मुलांना केबल वायरने मारहाण करून जखमी केले. त्यामुळे वडिलांपासून वाचून मुले घराबाहेर पळून सोसायटीत आली.

तिथे एकाने हा प्रकार पाहिला असता त्याने बाल हक्क कृती समितीला याबाबत कळविले. त्यानुसार बाल हक्क कृती समितीने घटनास्थळी पोहोचून याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार वडिलांवर बाल हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विमानतळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.