Pimpri News: महापालिका आयुक्तांचे काम निःपक्षपाती, शासन त्यांच्या पाठिशी – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांवर खापर फोडण्याचा आणि त्यांच्या चांगल्या कामावर ठपका ठेऊन चुकीचे काम लपवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. आयुक्त चांगले काम करीत आहेत. शासन त्यांच्या मागे खंबीर पणे उभे आहे. त्यांनी कोणतीही तमा न बाळगता शहरातील जनतेच्या हिताची कामे करावीत. चांगल्या कामाचे कौतुक होणारच आणि असमाधानी लोक ओरड करणारच, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.

खासदार अमोल कोल्हे यांच्या महासभेतील उपस्थितीबाबत बनसोडे म्हणाले, हा पक्षादेश आहे. आपले शिलेदार आणि सत्ताधारी कसे काम करतात, चुकीचा विषय बहुमताने रेटून मंजुर करायचा व आर्थिक जुळणी न झालेले विषय दाबून ठेवायचे ही सत्ताधारी पक्षाची पद्धत आहे. खासदार कोल्हे यांनी दिलेल्या भेटीत आमच्या नरगरसेवकांची सभागृहातील कामगिरी व सत्ताधाऱ्यांची लपवाछपवी समोर आली. पुढील काळात असाच ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे.

शहरातील जनतेची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. खासदारांनी दिलेली भेट अनपेक्षित होती. चुकीची कामे होऊ द्यायची नाहीत असा आयुक्तांनी घेतलेला पवित्रा योग्य असून आयुक्तांच्या कामाचे आम्ही समर्थन करतो. त्यांचा चांगल्या कामाचे निश्चित कौतुक करू तसेच त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहू.

पुढील काळातही पक्ष असेच विविध पदाधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभा कामकाज पाहणीसाठी पाठविणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पणे सांभाळली जाईल. पक्षाची सत्ता पुन्हा शहरात येणार असून त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत. चांगल्या कामाचे कौतुक करणे ही आमची पद्धत असून मागील काळात कोणतेच चांगले काम झाले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे कौतुक करण्याचा प्रश्न नसल्याचेही बनसोडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.